श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- तालुक्यातील मांडवे -फत्त्याबाद येथील शिवरस्त्यावर अनेक वर्षापासून अतिक्रमण असल्याने रस्ता वहिवाटीस सुरू नव्हता.त्यामुळे या परिसरातील दोन्ही गावातील शेतकऱ्यांना रस्ता नसल्याने शेतीची कामे करता येत नव्हती.यासंदर्भामध्ये अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या.
शेतकऱ्यांचा काही दिवसांपासून महसुल प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र लढ्याला अखेर यश मिळाल्याने हा रस्ता राजस्व अभियान अंतर्गत मौजे मांडवे -फत्त्याबाद शिवरस्ता खुला झाला.वीस वर्षापासून बंद असलेला शिवरस्ता प्रामुख्याने गट नं १३५ व फत्त्याबाद गट नं ६६ या बांधावरील शिवरस्ता पुर्ण:तहा बंद होता.दोन ते अडीच किलोमीटर बंद असलेला रस्ता हा मोकळा झाल्याने अडीचशे ते तीनशे शेतकऱ्यांना या रस्त्याचा लाभ होणार आहे.त्यामुळे काही जमिनी केवळ रस्ता नसल्याने पडीक पडलेल्या होत्या.शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत शिवरस्ते खुले करून देण्याची योजना राबवित आहेत.याबाबत महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्राप्त आदेशानुसार श्रीरामपूर तलसीलदार मिलींद वाघ व उपअधीक्षक तालुका भुमिलेख श्रीरामपूर व पोलीस निरीक्षक लोणी यांना आदेश प्राप्त झाल्यानंतर हि कारवाई करण्यात आली.अशी माहिती महसुल अधिकाऱ्यांनी दिली.त्यानुसार हि कारवाईत नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे,मंडलाधिकारी बी के मंडलिक,तलाठी इम्रानखान इनामदार,सुवर्णा शिंदे, हिमालय डमाळे यांच्या पथकाने कारवाई केली.
यावेळी मांडवेचे सरपंच सविता वडितके, फत्त्याबादचे सरपंच ज्ञानेश्वरी आठरे यांच्यासह दोन्ही गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तात हा रस्ता खुला करण्यात आला.त्यामुळे शेतकरी वर्गात आंनदाचे वातावरण निर्माण झाले.
रस्ता खुला झाल्याने मांडवे -फत्त्याबाद या दोन गावातील तीनशे त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना या रस्त्यामुळे फायदा होईल.शेतकऱ्यांसाठी रस्ता लाभदायक ठरणार आहेत.
बी.के.मंडलिक(मंडलाधिकारी)