अशोकनगर( जनता आवाज वृत्तसेवा ): – अशोक सहकरी साखर कारखान्याच्या नविन ६० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प, नविन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प तसेच नविन इन्सीनरेशन बॉयलर आदींचा उद्घाटन समारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नाम.नितीन गडकरी यांचे हस्ते तसेच कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी (दि.२६) रोजी सकाळी ११ वा. संपन्न होणार असल्याची माहिती व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी दिली.
सदर कार्यक्रमास खा.सदाशिव लोखंडे, खा.डॉ.सुजय विखे, माजी मंञी आ.प्रा.राम शिंदे, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी मंञी आ.शिवाजीराव कर्डिले, जिल्हा बँकेचे व्हा.चेअरमन ॲड्.माधवराव कानवडे, आ.आशुतोष काळे, आ.लहू कानडे, आ.सत्यजित तांबे, माजी आ.चंद्रशेखर घुले, माजी आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे, माजी आ.आण्णासाहेब माने, माजी आ.चंद्रशेखर कदम, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजपाचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी, माजी उपनगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
अशोक सहकारी साखर कारखान्याचे सध्या प्रतिदिन ४० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प तसेच प्रतिदिन ४० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित आहे. आता नविन प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेच्या डिस्टीलरी प्रकल्पामुळे प्रतिदिन १ लाख लिटर पर्यंत अल्कोहोल उत्पादन तसेच नविन ६० हजार लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पामुळे प्रतिदिन १ लाख लिटर पर्यंत इथेनॉलची निर्मिती होणार आहे. त्याचप्रमाणे नविन २२ टी.पी.एच. (टन प्रतितास) क्षमतेच्या नविन इन्सीनरेशन बॉयलरमुळे प्रतितास २ मेगावॅट वीज निर्मिती होऊन त्यावर नविन डिस्टीलरी व नविन इथेनॉल प्रकल्प चालविला जाणार आहे. तसेच डिस्टीलरीमधून निघणाऱ्या स्पेंटवॉशचा वापर इंधन म्हणून केला जार असल्यास झिरो पोल्युशनचे (शून्य प्रदुषण) उद्दिष्ट साध्य होणार आहे.
सोमवार दि.२६ रोजी सकाळी ११ वा. कारखाना कार्यस्थळावर होणाऱ्या उद्घाटन समारंभास कारखान्याचे सभासद, शेतकरी, हितचिंतक, व्यापारी आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, कार्यकारी संचालक संतोष देवकर आणि संचालक मंडळाचे सदस्यांनी केले आहे.