संगमनेर, दि.२२,( जनता आवाज वृत्तसेवा ):-ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे त्यांनी दुस-यांच्या पंचायती करण्याचे काम बंद कराव, आम्ही डंके की चोटपे उघडपणे भाजपमध्ये गेलो, कॉग्रेसच्या विरोधात काम करणा-यांनी आम्हाला पक्षाच्या निष्ठे विषयी ज्ञान पाजू नये असा टोला महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
शहरातील साईनगर कडे जाणा-या म्हाळुंगी नदीवरील सुमारे ४ कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाचे भूमिपुजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी त्यांनी शहराच्या विकासाला भविष्यातही भरपुर निधी आपण उपलब्घ करुन देणार असून, या तालुक्याचा सांस्कृतीक आणि साहित्यीक वारसा जतन करण्यासाठी कवी अनंत फंदी आणि शाहिर विठ्ठल उमप यांचे स्मारक उभारण्याची घोषणा त्यांनी केली. खासदार सदाशिव लोखंडे, भाजापचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार, शिवसेनेचे शहर अध्यक्ष सोमनाथ कानकाटे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, मुख्याधिकारी राहुल वाघ आदि पदाधिकारी आणि नागरीक याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा खरपुस समाचार घेताना त्यांनी निष्ठेविषयी केलेल्या वक्तव्यावर टिकास्त्र सोडले. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसमध्ये असून सुध्दा थोरातांनी कम्युनिस्ट पक्षाच्या चिन्हावर उभे असलेल्या मेव्हण्याचे काम केले. १९८५ साली कॉंग्रेसच्या शंकुतला थोरात यांचाही पराभव केला. नाशिक पदवीधर निवडणूकीमध्ये स्वत:चेच मेव्हणे पक्षाच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडूण आणले. नुकत्याच झालेल्या नाशिक पदवीधर निवडणूकीतही अपक्ष म्हणून भाच्याचे काम केले. महाविकास आघाडीचा उमेदवार उभा असतानाही त्याचा पराभव करण्यात तुम्ही धन्यता मानली. तुम्ही कोणत्या निष्ठेच्या गप्पा करता, तुमच्याच दिव्याखाली अंधार आहे आमच्या पंचायती करु नका अशा शब्दात त्यांनी आ.थोरात यांना सुनावले.
आज तालुक्यात रोजगार उपलब्ध करुन देण्याची मोठी गरज आहे. येथील सहकारी औद्योगिक वसाहतीत उद्योग येण्यास तयार नाहीत. कारण येथे बाकीचेच उद्योग खुप चालतात. ही औद्योगिक वसाहत औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्त केली असती तर, येथे उद्योग आले असते. महायुती सरकारने नगर जिल्ह्यातील शिर्डी, नगर, तालुका आणि श्रीगोंदा येथे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. इतके वर्षे तुम्हाला का सुचले नाही.फक्त भूमाफीया, वाळू माफीया आणि टॅकर माफीया निर्माण करण्यातच तुम्ही धन्यता मानल्याची टिकाही ना.विखे पाटील यांनी केली.
म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या निधीचा इतिहास सर्वांना माहीत आहे. हा पुल का खचला याच्या चौकशीचे आदेश आता देणार आहे. या पुलाच्या भूमिपुजन सोहळ्यात माझ्या व्यक्तिगत भावना जोडल्या गेल्या आहेत. कारण या पुलाच्या कामाला खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करुन दिला होता, भूमीपुजनही त्यांनी केले. माझ्या नशिबाने दुस-यांदा भूमीपुजन करण्याची संधी मला मिळाली. चांगल काम करायला नशिबच लागतं. ज्यांच खर दायित्व होत त्यांनी हे काम करायला पाहीजे होतं. परंतू नाकर्त्या करंट्या लोकांमुळे हे काम लाबंले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
तालुक्याचा सांस्कृतीक वारसा लक्षात घेता, कवी अनंत फंदी आणि शाहीर विठ्ठल उमप यांचे स्मारक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देतानाच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संगमनेर येथील स्मारकाची जागा निश्चित करण्याची करण्याची सुचना त्यांनी पालिकेच्या मुख्याधिका-यांना दिल्या. तालुक्यातील निमगाव भोजापुर येथे पुलाचे भूमीपुजन तसेच कुरण येथील १० कोटी रुपयांच्या रस्ते विकासाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.