लोणी, दि.२३( जनता आवाज वृत्तसेवा ):-वारकरी संप्रदाय आणि संत सेवेत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल पुणे येथील भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे सहकारी हभप माऊली बाबा टाकळकर यांना यावर्षीचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार देऊन गुरुवार २८ मार्च रोजी लोणी जि. अहमदनगर येथे सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पूरस्कार निवड समितीचे अध्यक्ष महंत उद्धव महाराज मंडलिक,नेवासेकर यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सन २०१७ पासून हा पुरस्कार दिला जातो.लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार राज्यातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखालील भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील( ठाणे ) व प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे ( नेवासा ) ही त्रिसदसीय समिती पुरस्कार्थीची निवड करते.
यापूर्वी हभप पंढरीनाथ नाना तावरे (जालना), निष्काम कर्मयोगी हभप बाळकृष्ण महाराज भोंदे(अहमदनगर), हभप नामदेव महाराज शामगावकर ( सातारा ), स्वामी सागरानंद सरस्वती ( नाशिक ) व शांतिब्रम्ह मारुतीबाबा कुर्हेकर (पुणे),हभप श्रावण बाबा कुंवरा (पालघर) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
२०२४ च्या पुरस्काराची घोषणा करताना महंत उद्धव महाराज म्हणाले की, या पुरस्कारासाठी अनेक नावे समितीच्या विचाराधीन होते.आगामी काळात त्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यावर्षीसाठी आम्ही वारकरी संप्रदाय,संत विचार आणि साहित्य भारतात आणि जगातील अनेक देशात पोहचवण्याचे असामान्य कार्य गेली ८९ वर्षे करीत असलेले पुणे येथील ज्ञानेश्वर दगडोबा टाकळकर तथा माऊली बाबा यांची निवड केली आहे. वयाच्या ८ व्या वर्षांपासून ते वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहेत.
भजन,कीर्तन,अभंगवाणीच्या कार्यक्रमात टाळाची सुरेल साथ त्यांनी दिली. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या संतवाणी कार्यक्रमात त्यांनी ३५ वर्षे साथ-संगत केली.त्यांच्याबरोबर भारतातील अनेक राज्यात अमेरिका,इंडोनेशिया,जकार्ता,नेपाळ,दुबई,अबुधाबी,शारजाह आदी देशात कार्यक्रम करताना त्यांनी आपल्या अप्रतिम टाळवादनाने श्रोत्यांची मने जिंकली.आज वयाचा ९७ व्या वर्षी देखील ते हरिपाठ,काकडा,भजन आणि अभंगवाणीच्या कार्यक्रमात सहभाग देत आहेत.बाबांचे संपूर्ण जीवन आदर्श आणि प्रेरणादायी असून त्यांना हा पुरस्कार घोषित करताना आम्हाला मनस्वी आनंद आणि समाधान वाटते.
मानपत्र,स्मृती चिन्ह आणि २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून गुरुवार दि.२८ मार्च रोजी सकाळी ११ वा. संत तुकाराम महाराज मंदिर प्रांगण लोणी बुद्रुक ता.राहाता जि. अहमदनगर येथे भव्य समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.या समारंभाला राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील,खा.डॉ.सुजय विखे पाटील, शब्द प्रभू प्रा.नरेंद्र महाराज गुरव, हभप भारत महाराज धावणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराच्या घोषणे प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष देविदास म्हस्के,लोणीच्या सरपंच कल्पनाताई मैड,विखे पाटील ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी,लोणी विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव धावणे,उपाध्यक्ष नानासाहेब म्हस्के यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.




