नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा):- किराणा मालाच्या टेम्पोला दुचाकी आडवी घालून गावठी कट्टा दाखवून, दोन लाख रुपये असलेली बॅग पळविण्यात आली. सदर घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास कुकाण्याजवळील देवढे वस्तीच्या ओढ्यावर कुकाणा-दहिगाव मार्गावर घडली.
दि. २१ फेब्रुवारी रोजी रात्री नाना कारभारी निकम यांनी बाफना यांच्या दुकानातून माल वाहतूक टेम्पो ७०९ (नं. एमएच१७ जी ७४४३ यामध्ये किराणा माल भरून श्री. निकम व टेम्पोवरील ड्रायव्हर व किराणा माल उतरवण्यासाठी असलेले दोन मजूर गोरक्षनाथ नाबदे व अक्षय इंगळे असे चौघे निघाले होते. तरवडी येथे माल टाकून ते गेवराई, शिरसगाव, वरखेड, रामडोह, चिकणी खामगाव, गोपाळपुर, धनगरवाडी, खामगाव व दहीगाव येथे माल टाकला व मालाचे पैसे श्री. निकम यांनी त्यांच्याकडे घेऊन बॅगमध्ये ठेवले. ते सर्वजण कुकाण्याकडे टेम्पोमध्ये बसून येत असताना कुकाणा गावाच्या शिवारात मळीच्या ओढ्याजवळ एक ट्रॅक्टर बंद पडलेला असल्याने त्यांचा टेम्पो हाळु झाला असता ड्रायव्हरच्या बाजूने पाठीमागून एक पल्सर मोटार सायकलवर दोन इसम तोंडाला मास्क लावून आले. त्यांच्यापैकी एकाने ड्रायव्हरच्या डोक्याला गावठी कट्टा लावून टेम्पो थांबविण्यास सांगितला, टेम्पो थांबविल्यानंतर एकाने कट्टा उलटा करून श्री. निकम यांच्या छातीत मारहाण केली.
तसेच दोन्ही पल्सर मोटारसायकल टेम्पोच्या समोर आडव्या लावल्या. त्याच्यातील एकाने पैशाची बॅग हिसकावून घेऊन दोन्ही मोटारसायकलवरील चोरटे पसार झाले. याप्रकरणी नाना कारभारी निकम (वय ५६, रा. कुकाणा) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.