अशोकनगर( जनता आवाज वृत्तसेवा ) : – अशोक कारखान्याचा नविन अल्कोहोल, इथेनॉल व इन्सीनरेशन बॉयलरचा उदघाटन समारंभ उद्या केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांचे हस्ते आयोजित केला होता. तथापि, सोमवार (दि.२६)रोजीच श्री.गडकरी यांचे नागपूर येथील मतदार संघात देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम असल्याने उद्याचा नियोजित उदघाटन समारंभ स्थगित केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी दिली.
यासंदर्भात सविस्तर माहिती देताना श्री.मुरकुटे यांनी सांगितले की, अशोक कारखान्याच्या तीन नविन प्रकल्पांचा उद्घाटन समारंभ उद्या सोमवारी (ता.२६) केंद्रीय मंत्री नाम.श्री.नितीन गडकरी यांचे हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. तथापि, सोमवार (दि.२६) रोजीच देशाचे पंतप्रधान नाम.श्री..नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय रेल्वेच्या ५५४ रेल्वे स्टेशन्स तसेच १५८५ ओव्हर ब्रीजेस आणि बोगद्यांच्या कामांचा उद्घाटन समारंभ संपन्न होत असून त्यामध्ये नागपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशनच्या कामाचाही समावेश आहे.
पंतप्रधान नाम. श्री.नरेंद्र मोदी यांचा सदरचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांचे नागपूर स्वत:चे मतदार संघात असल्याने त्यांना सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे अशोक कारखान्याचा नियोजित उद्घाटन समारंभ स्थगित करण्यात आला असून पुढील कार्यक्रमाबाबत कळविण्यात येईल. तरी सभासद, शेतकरी व हितचिंतक आदींनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री.मुरकुटे यांनी केले आहे.