नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-उद्या दि. 26 फेब्रुवारी रोजी विळद बायपास आणि नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
यामध्ये अहमदनगर बायपास या 41 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 961 कोटी रुपये, टप्पा क्र.1 मधील अहमदनगर ते घोगरगाव या 38 किमीच्या रस्त्यासाठी 980 कोटी रुपये तर टप्पा क्र.2 मधील घोगरगाव ते जिल्हा हद्द या 41 किमीच्या रस्त्यासाठी 1032 कोटी रुपयांच्या निधीतून सदरील कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये टप्पा क्र.1 मध्ये 15 गावांचा आणि टप्पा क्र.2 मध्ये 13 गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ 18 महिन्यातच सदरील काम पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी सुजय विखेंनी दिली.
तसेच या रस्ते विकासामुळे अहमदनगर ते सोलापूर प्रवासादरम्यानचा कालावधी कमी होऊन प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे. तसेच या रस्त्यांमुळे आर्थिक विकास होऊन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील. यासोबतच शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतमालाची वाहतूकही अधिक सुखकर होईल असे मत खासदार विखेंनी व्यक्त केले.
सदरील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार देखील त्यांनी यावेळी मानले. तसेच अशीच विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि पाठपुरावा करण्यासाठी सदैव तत्पर असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे देखील आभार सुजय विखेंनी मानले.