संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- मराठी भाषा ही आपली आई आहे. ती अधिक समृद्ध होण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे असून पुढील पिढ्यांना कमीत कमी तीन भाषा यायला हव्यात असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केले असून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशोधन कार्यालय येथे संगमनेर मधील साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला असून काव्य मैफीलीसह चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, साहित्यिक प्रा बाबा खरात, कवी अनिल सोमणी, प्रा शशांक गंधे, अनिल देशपांडे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर ,ज्ञानेश्वर राक्षे, सुनील सातपुते ,सौ जयश्री शिंदे, सौ अपर्णा दानी, अनिल चांडक, सुभाष कर्डक, नाना गुजराथी, मुरारी देशपांडे, कारभारी देव्हारे, डॉ सुधाकर पेटकर, प्राचार्य महाजन, मुकुंद डांगे, डॉ अमित शिंदे, अंतोन घोडके, आदींसह विविध साहित्यिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ तांबे म्हणाले की मराठी भाषेला मोठी वैभवशाली परंपरा आहे. ती अधिक समृद्ध झाली पाहिजे. स्थानिक पातळीवर आपण भाषा समृद्धीसाठी विविध उपक्रम राबवणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे .तसेच नव्या पिढीतील प्रत्येकाला कमीत कमी तीन भाषा यायला हव्या असेही ते म्हणाले.
सौ दुर्गाताई तांबे म्हणाले की, मराठी भाषा दिन हा महाराष्ट्राचा गौरव दिन ठरतो आहे. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने वैचारिक समृद्धीसाठी काम होत असून मोठी वाचन चळवळ उभी राहिली असल्याचे त्या म्हणाल्या.
या काव्य मैफिलित प्रा बाबा खरात यांनी गायलेल्या श्रापदांना पाळणारी माणसे पाहिली, माणसांना टाळणारी माणसे पाहिली या कवितेने अंगावर शहारे उमटवले. तर सुभाष कर्डक यांनी सौ दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकर्तुत्वावर तुझीच कमाई आहे दुर्गाताई, बलशाली झाली महिलामाई. ही कविता सादर केली तर अनिल देशपांडे यांच्या काळजाच्या पायथ्याला वेदनेचे गाव आहे या कवितेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले कारभारी देवारे यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यावर तर सौ जयश्री शिंदे यांनी मराठी लावणी गायली. मुरारी देशपांडे यांच्या इंग्रजी माध्यमातील आई मुलांचा संवाद या कवितेने सर्वांना खळखळून हसवले. यानंतर सुनील सातपुते, अरविंद गाडेकर, अपर्णा दानी, अनिल चांडक ,नाना गुजराती, अमित शिंदे यांचा विविध मान्यवरांनी आपल्या कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बाबा खरात यांनी केले सूत्रसंचालन अनिल सोमणी यांनी केले तर नामदेव कहांडळ यांनी आभार मानले
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा- आ. थोरात
मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आणि वैभवशाली भाषा आहे. अनेक संत, साहित्यिक, लेखक, कवी आणि वाचक सुद्धा यांनी या भाषेच्या समृद्धीसाठी मोठे योगदान दिले असून मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करताना उपस्थित सर्व साहित्यिक व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना शुभेच्छा दिल्या