कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा) :- शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त पैसा आला पाहिजे आणि शेतकऱ्यांकडे आलेला पैसा जास्तीत जास्त त्यांच्या खिशात राहिला पाहिजे. यासाठी नव तंत्रज्ञानयुक्त अभ्यासपूर्ण डाळिंब शेती कशी करावी याचे ज्ञान घेणे अत्यावश्यक असल्याचा मौलिक सल्ला फार्म डीएसएस ॲग्रीटेकचे संस्थापक आणि डाळिंबरत्न बाबासाहेब उर्फ बी. टी. गोरे यांनी दिला.
राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे खांदे पाटील ॲग्रो , टाकसाळ पाटील ॲग्रो , शेखर ॲग्रो सर्व्हिसेस, महेश ॲग्रो एजन्सी, एमपीएससी डाळिंब कन्सल्टन्सी व फॉर्म डीएसएस यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब पीक व्यवस्थापन एकदिवसीय मोफत कार्यशाळा आज एक हजार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या चर्चासत्रात डाळिंबरत्न बी. टी. गोरे यांनी डाळिंब लागवडी पूर्वीपासून ते फळ काढणी पर्यंत काय काळजी घ्यावयाची या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती देऊन शेतकऱ्यांचे शंका निरसन केले. तसेच या कार्यशाळेमध्ये डाळिंब लागवड, त्याची पूर्वतयारी, डाळिंब लागवड ते पहिला बहार स्टोरेज अवस्था, डाळिंब पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग, कीड व तण व्यवस्थापन, डाळिंब बहार व्यवस्थापन तसेच जमिनीची सुपीकता कशा पद्धतीने वाढवता येईल याविषयी त्यांनी त्यांचा १७ वर्षाचा दांडगा अनुभवही सांगितला. तसेच डाळिंब उत्पादकांना होणारा अतिरिक्त खर्च कसा कमी करता येईल याविषयी अनेक बारकावेदेखील या कार्यशाळेमध्ये सांगितले.
यावेळी डाळिंबरत्न बी. टी. गोरे लिखित डाळिंब पीक व्यवस्थापन – आंबे बहार २०२४ या लघुपुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी राहुरी मार्केट कमिटीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार, विखे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव कडू, संचालक स्वप्निल निबे, चिंचोलीचे माजी सरपंच गणेश हारदे, ऋषीकेश खांदे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत सहभागी सर्व डाळिंब उत्पादकांना या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये शेतीपूरक गोष्टींचा पुरवठा करणार्या ३० कृषी निवेष्ठा विक्रेत्या कंपन्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते.
डाळिंब पीक व्यवस्थापन कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता सचिन चिंधे, हर्षल खांदे, संकेत टाकसाळ, सचिन शिरसाठ, संदिप कुऱ्हे आदि प्रयत्नशील होते.