23.7 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

शीतल भागवतचा अभियंतापदी निवड झाल्याबद्दल युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार 

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ):-कोपरगाव तालुक्यातील मढी (खुर्द) येथील शीतल संजय भागवत हिची सरळ सेवा परीक्षेतून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात अभियंता पदावर निवड झाली आहे. त्याबद्दल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते शीतलचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कुटुंबातील शीतल भागवत हिने हे नेत्रदीपक यश मिळवून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक केले असून, कोपरगाव तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. तिच्या या यशाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत कोल्हे यांनी शीतलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सोमवारी (४ मार्च) झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, अप्पासाहेब दवंगे, विलास माळी,रमेश आभाळे, माजी संचालक राजेंद्र भाकरे, शीतल भागवत हिचे वडील संजय रखमाजी भागवत, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, उपाध्यक्ष बाजीराव मांजरे, रामनाथ आभाळे, मच्छिंद्र आभाळे आदी उपस्थित होते.

विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, शीतल संजय भागवत ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून, तिने कोळपेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. नाशिक येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला असून, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च, अवसारी, पुणे येथून इंजिनीअरिंगची पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात अभियंता पदाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या सरळ सेवा परीक्षेत शीतल भागवत ही चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.

या यशामुळे तिची जलसंपदा विभागात अभियंता पदावर निवड झाली आहे. शीतलने जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यास व सराव करून हे नेत्रदीपक यश मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. शीतलचे हे यश निश्चितच वाखाणण्याजोगे असून, ग्रामीण भागातील मुलींमध्येही ‘टॅलेंट’ आहे हे तिने सिद्ध केले आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी ते प्रेरणादायी आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. अशा काळात ग्रामीण भागातील मुला-मुलींनी मनात कसलाही न्यूनगंड न बाळगता जिद्द, चिकाटी व अभ्यासात सातत्य ठेवून प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेऊन प्रगती साधावी, असे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचे स्वप्न होते. त्यासाठी स्व. कोल्हेसाहेबांनी कोपरगाव येथे संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब,सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच पाठबळ दिले.

संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढील काळातही नेहमीच सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी शीतल भागवत हिचे वडील संजय भागवत यांचाही विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!