पुणतांबा दि.५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाची प्रक्रीया वेगाने पुढे जात आहे. मात्र काही नतद्रष्ट लोकांना हे सहन होत नाही. वास्तविक ज्यांना स्वत:चा तालुका सांभाळता आला नाही त्यांनी निधी देत नसल्याचा विखे पाटलांवर केलेला आरोप अत्यंत हस्यास्पद असून, विकास कामांमध्ये अडथळा आणणारी ही ‘महामारी’ वेळीच थोपवावी लागेल असे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष डॉ.धनंजय धनवटे यांनी केले आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात डॉ.धनवटे यांनी म्हटले आहे की, विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून जिल्ह्यात आणि तालुक्यात विकासाची प्रक्रीया कशी पुढे जाते हे वर्षानुवर्षे सर्वांनी पाहीले आहे. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता सार्वजनिक कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची भूमिका ही विखे पाटील परिवाराची असते. मात्र काही बाहेरच्या अपप्रवृत्ती तालुक्यात येवून जनतेची जाणीवपुर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांचा हा केवीलवाना प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. राहाता तालुक्यातील जनता ही अतिशय सुज्ञ असून, विखे पाटील यांच्या कामाची पध्दत जनतेला चांगली माहीत असल्याने त्यांच्या विरोधात मोर्चे काढून गरळ ओकण्याचा केलेला प्रयत्न हस्यास्पद ठरला आहे.
ज्या गावातील प्रश्नांचे भांडवल करुन, विवेक कोल्हे यांनी मोर्चा काढला त्या गावात मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी यापुर्वी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये रामपुरवाडीला १ कोटी रुपये, नपावाडीला १ कोटी ६३ लाख, चितळी गावासाठी ७ कोटी ३३ लाख, जळगावला २ कोटी, धनगरवाडीला १ कोटी इतक्या निधीतून विकास कामे मार्गी लागत आहेत. तरीही निधी मिळत नसल्याचा आरोप करुन केला जात असलेला थयथयाठ हा निराधार आणि व्यक्तिव्देशातून असल्याची टिका डॉ.धनवटे यांनी केली.
विकास प्रक्रीयेत राहाता तालुका हा राज्यात वरच्या स्थानावर आहे. शासनाच्या व्यक्तिगत लाभाच्या योजनाही प्रत्येक गावापर्यंत पोहोचत आहेत. हे सहन होत नसलेल्या अपप्रवृत्ती आता केवळ विखे पाटलांना बदनाम करण्यासाठी तालुक्यात येवून या विकास प्रक्रीयेला बदनाम करु पाहात आहेत. पण त्यांचा हा डाव तालुक्यातील जनता कदापीही यशस्वी होवू देणार नाही. कारण गणेश कारखाना निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले हे सभासदांनी आता अनुभवले आहे. इतर कारखान्यांपेक्षा आम्ही ५० रुपये जादा भाव देवून अशा वल्गना करणा-यांनी २५० रुपये भाव कमी देवून शेतकरी, सभासदांची केलेली फसवणूक सगळ्यांना पाहायला मिळाली आहे. कामगारांचे पगारही करू न शकलेल्यांनी या भागात येवून ज्ञान देण्याचे काम करु नये असा स्पष्ट इशारा डॉ.धनवटे यांनी पत्रकातून दिला आहे.