श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर राहुरी मतदार संघातील वीजपुरवठा सुरळीत करण्याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येऊन काही विजेचे प्रश्न सुटले असून उर्वरित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यासाठी अति उच्चदाब सब स्टेशन नसल्याने बाभळेश्वर नेवासा या ठिकाणाहून मतदार संघात वीज पुरवठा होतो. उच्चदाब सबस्टेशन नसल्याने होल्टेज कमी असल्याच्या तक्रारी सर्व वीज ग्राहक अनेक वर्षापासून करीत आहेत. उच्चदाब सबस्टेशनसाठी आपण आमदार झाल्यापासून प्रयत्न सुरू केले होते. याबाबत विधानसभेत वेळोवेळी प्रश्नही उपस्थित केले. आता उच्चदाब सबस्टेशनसाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध झाली असून सर्व प्रशासकीय तांत्रिक पूर्तता करून महाराष्ट्र राज्य विद्युत आयोगाकडुन काम सुरू करण्याकरता मान्यता मिळून लवकरच हे काम सुरू होईल.
मतदार संघातील राहुरी तालुक्यातील वांजुळपोई सबस्टेशन कार्यान्वित झाल्याने या तालुक्यातील पाथरे, वांजुळपोई, तिळापुर, मांजरी,शेनवडगाव व कोपरे या गावांना वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत झाली आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातील गणेशखिंड सबस्टेशन ओव्हरलोड झाले होते परंतु घोगरगाव सबस्टेशन मंजूर होऊन प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्याने गणेशखिंड सबस्टेशनवरील घोगरगाव व जैनपूर येथील लोड कमी झाला आहे. घोगरगाव सबस्टेशन कार्यान्वित झाल्याने गणेशखिंड सबस्टेशनवरील लोड कमी होऊन गुजरवाडी, वांगी, खिर्डी तसेच कारेगावचा काही भाग या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे घोगरगाव सबस्टेशन साठी ते ३३ केव्ही लाईन आल्याने गणेशखिंड सबस्टेशनला होल्टेजसाठी मोठा लाभ झाला आहे.
मातापुर सबस्टेशनसाठी नेवासा ते मातापूर अशी स्वतंत्र ३३ केव्ही लाईन मंजूर झाली असून तिचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मातापुर सबस्टेशनवरील गावांना वीज पुरवठ्याबाबत त्याचा लाभ मिळणार आहे. तसेच टाकळीभान व बेलापूर या ठिकाणी कॅपॅसिटर बँक मंजूर झाले असून त्यामुळे लाईनवरील ३० एंपियरचा लोड कमी झाला असून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.