23.5 C
New York
Saturday, August 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

महिलांनी हिमतीने व एकजुटीने संकटावर मात करून प्रगती साधावी-स्नेहलताताई कोल्हे संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेतर्फे महिला बचत गटांना १ कोटी ६३ लाख ७६ हजार रुपयांचे कर्ज व फिरता निधी वाटप

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- महिला बचत गटामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांचे जीवनमान सुधारले आहे. महिलांचा आत्मविश्वास व सन्मान वाढला असून, त्यांची प्रगती व आनंदी जीवन पाहून मला मनस्वी आनंद वाटतो. महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझी ऊर्जा आहे. महिलांनी कोणत्याही संकटाला न घाबरता मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन एकजुटीने व आत्मविश्वासाने संकटावर मात करावी. संकटाने थांबून न जाता हिमतीने लढून एकमेकींना साथ देऊन आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती साधावी, असे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (८ मार्च) कोपरगाव येथील संजीवनी महिला बचत गट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेतर्फे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते कोपरगाव तालुक्यातील २४ महिला बचत गटांना विविध बँकांनी मंजूर केलेल्या ७५ लाख २६ हजार रुपये कर्जाचे तसेच ५४३ बचत गटांना व २ ग्रामसंघांना फिरता निधी (आर. एफ.) म्हणून ८८ लाख ५० हजार रुपये अशा एकूण १ कोटी ६३ लाख ७६ हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, जिल्हा कार्यकारिणी सदस्या अनिताताई गाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्नेहलताताई कोल्हे यांनी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांचे प्रतिमा पूजन करून अभिवादन केले व सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, महिला मंडळ व महिला बचत गटात काम करून मी राजकारणात आले. आमदार झाल्यानंतर शासन दरबारी महिलांचे विविध प्रश्न मांडून ते सोडवले. महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला. २२ वर्षांपूर्वी म्हणजे २००२ मध्ये मी कोपरगाव तालुक्यात हजारो महिलांना संघटित करून अनेक महिला बचत गट स्थापन केले. तालुक्यात महिला बचत गट चळवळ रुजवली. उंबऱ्याच्या आत अडकलेल्या महिलांना चूल व मूल यातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. महिलांना आर्थिक बचतीची सवय लावून बँक व्यवहाराची माहिती करून दिली. महिला बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून दिले. बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लावला. महिलांना समाजात सन्मान मिळवून दिला. बचत गटामुळे महिलांची समाजात पत वाढली असून, आज हजारो महिला आत्मविश्वासाने आनंदी जीवन जगत आहेत.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने व राज्यातील महायुती सरकारने महिला सक्षमीकरणावर भर देत महिलांसाठी सुकन्या समृद्धी योजना, मातृत्व वंदन योजना, लेक लाडकी योजना यासारख्या अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. भारत महासत्ता होण्यासाठी महिलांचे सर्वार्थाने सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. माऊली, माता या शब्दात खूप मोठी ताकद आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा मातेचे रूप आहे. मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व असे सर्व गुण महिलांमध्ये आहेत. आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. पुरुषांच्या बरोबरीने त्या सर्व क्षेत्रात चमकत आहेत. ज्या घरात महिलांचा सन्मान होतो, तेच घर प्रगती करते. पुरुषांनी महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून, त्यासाठी तुमची साथ कायम असू द्या, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी अनुपमा सोनवणे, वैशाली पाठक, मनीषा ढवळे, शीतल माळवे आदींनी आपले अनुभव कथन करून स्नेहलताताई कोल्हे यांच्यामुळे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाल्याचे सांगितले. कार्यक्रमास तालुक्यातील महिला बचत गटाच्या पदाधिकारी, सदस्या व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांना खरा मान सन्मान तेव्हाच मिळेल जेव्हा आई आणि बहिनीवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या समाजात बंद होतील तर महीलांप्रती सर्व स्तरातून अधिक आदर वाढेल याचीही जाणीव सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!