लोणी दि.९( जनता आवाज वृत्तसेवा ):-महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत लोणीच्या प्रवरा कन्या विद्या मंदिरने पुणे विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला. २१ लाख रुपये, ट्रॉफी व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
मुंबई येथील टाटा नाट्यगृहात राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री मा. दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
या भव्य दिव्य कार्यक्रमात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, संचालिका सौ. रोहिणी निघुते, सौ. अलका दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्राचार्या भारती कुमकर, समन्वयक प्रा. गिरीश सोनार, सौ. विद्या घोरपडे, रामचंद्र लबडे आणि जितेंद्र बोरा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस, गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, केंद्रप्रमुख दातीर हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आचार्य अत्रे यांनी एका कवितेत म्हटल्याप्रमाणे आई जशी एखाद्या बाळाला लळा लावते तशी शाळा ही विद्यार्थ्यांना लळा लावणारी असली पाहिजे हा विचार मनात धरून माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान सुरू करण्यात आले. हे अभियान केवळ यंदापुरते मर्यादित न राहता दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात याव्यात व त्यातून प्रत्येक शाळेचा विकास घडून यावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे शाळेच्या विकासात, सजावटीमध्ये व सौंदर्यामध्ये भर पडत असताना हा चमत्कार ज्यांच्यामुळे घडला ते विद्यार्थी हीच महाराष्ट्राची खरी शक्ती आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केले.
शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. पी.एम. दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, समन्वयक नंदकुमार दळे यांनी अभिनंदन केले.