21.8 C
New York
Monday, August 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

६५ वर्षीय आजीने एकविराच्या क्रिकेट स्पर्धेत घेतला खेळण्याचा आनंद महिला दिनानिमित्त आयोजित क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत २५००  महिलांचा सहभाग

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):– युवक काँग्रेसच्या नूतन अध्यक्ष व कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत तालुक्यातील २५००  महिलांनी सहभाग घेतला असून आज वडगाव लांडगा येथील ६५  वर्षीय सौ . सुमन बाळासाहेब लांडगे यांनी फलंदाजी व क्षेत्ररक्षणात आपले कौशल्य दाखवताना या स्पर्धेचा आनंद घेतला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशन च्या वतीने क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा सुरू आहेत.स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ६५  वर्षीय आजी मैदानात उतरतात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. वडगाव लांडगा विरुद्ध पिंपळगाव या संघामध्ये पाच शटकांची मॅच झाली. यामध्ये प्रथम वडगाव लांडगा कडून सलामीसाठी 65 वर्षीय सुमन बाळासाहेब लांडगे मैदानात येतात उपस्थित सर्व महिला व मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला. आजींनी पहिला बॉल अत्यंत सुंदर खेळून काढला तर दुसऱ्या बॉलवर दोन रन काढून संघाची सुरुवात केली. पुन्हा दोन बॉल खेळून काढल्यानंतर सहाव्या बॉलवर खणखणीत चौकार मारला. ६५  व्या वर्षी अत्यंत तंदुरुस्तीने व आनंदाने मैदानात उतरताना सर्व युवतींना प्रोत्साहित केले. पाच षटकांच्या समाप्तीनंतर ३६  धावसंख्येवर पिंपळगाव कोंझिरा संघाला आव्हान दिले.

यानंतर एक्स्ट्रा कव्हर ला सुंदर क्षेत्ररक्षण करताना आजींनी क्रिकेट प्लेअरची टोपी घालून सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करताना या क्रिकेट खेळाचा आनंद घेतला .या खेळात पिंपळगाव कोंजीरा संघ विजयी झाला. मात्र आजीच्या सहभागाने हा संघ सर्वांची मने जिंकून गेला.

यावेळी बोलताना सौ सुमन लांडगे म्हणाल्या की, आमचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम बनवला आहे. तालुक्यात शांततेचे व विकासाचे वातावरण आहे .महिला दिनाच्या निमित्ताने डॉ जयश्रीताई थोरात यांनी सर्व महिला भगिनींना एकत्र करत या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आज या ठिकाणी 2500 महिला उपस्थित आहेत. खेळातून आरोग्य चांगले राहते .जुन्या काळामध्ये कष्ट केले जायचे. त्यामुळे महिलांचे आरोग्य चांगले असायचे .आता शहरी महिलांची कष्टाची सवय कमी झाली आहे. मात्र मैदानी खेळ खेळल्याने आरोग्याला चांगला फरक पडणार आहे .

मागील वर्षी मी या स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. आणि त्यावर्षी निश्चय केला होता की मी पुढील वर्षी खेळेल .मागील चार दिवस गावात सराव करून आज या स्टेडियम मध्ये खेळण्याचा मला खूप आनंद मिळाला आहे.

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लहान मुलींसह अनेक महाविद्यालय युवती आणि स्त्रियांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. सर्वांच्या सहकार्याने सहभागाने ही स्पर्धा यशस्वी ठरत असून महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. महिलांमध्ये आरोग्य जाणीव जागृती निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश असून वर्षभर महिलांसाठी विविध उपक्रम सुरू राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी सर्व विजेत्या संघांसह ६५  वर्षीय सुमन लांडगे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!