कोपरगांव:-दि.११ ( जनता आवाज वृत्तसेवा):-शेतीला जोडधंदा मिळावा या उददेशांने संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्था व संजीवनी फार्मर्स फोरमच्या सहकार्याने शेतक-यांना मागणीप्रमाणे मत्स्यबीज मिळावे म्हणुन मत्स्यबीज केंद्र उभारणीचे भूमिपुजन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी खिर्डीगणेश परिसरात संपन्न झाले.
प्रारंभी संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष कारभारी लभडे व उपाध्यक्ष विष्णुपंत क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजीवनी फार्मर्स फोरमचे संजीव पवार यांनी प्रास्तविक केले.
श्री. विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी येथे दुग्धोत्पादनाचा शेतीला जोडधंदा निर्माण करत मत्स्यपालनासही प्रोत्साहन दिले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी फार्मर्स फोरम अंतर्गत मत्स्यबीज केंद्र उभारणी हाती घेतले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतक-यांच्या मागणीप्रमाणे मत्स्यबीजाचा पुरवठा करण्यांत येणार आहे.
शेततळयाबरोबरच गोडया पाण्यातील मत्स्य शेती व्यवसायाला देशाबरोबरच महाराष्ट्र राज्याला चांगले दिवस असुन देशांतर्गत ६० हजार कोटी रूपयांची मासळी निर्यात होते त्यात एकटया तेलंगणा, आंधप्रदेश राज्याचा वाटा ४५ हजार कोटी रूपयांचा आहे. मत्स्य बीज संवर्धन ते विपणन पर्यंत सगळ्या गोष्टी एकाच छताखाली समासा शेतकऱ्यांना पुरवल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त तरुणांनी मत्स्य शेतीकडे वळावे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री, विश्वासराव महाले, आप्पासाहेब दवंगे, ज्ञानदेव औताडे, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, राजेंद्र कोळपे, त्र्यंबकराव सरोदे, माजी सभापती मच्छिंद्र टेके,संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र परजणे यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी, शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संचालक आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले. सुत्रसंचलन उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी केले.