कोळपेवाडी (जनता आवाज वृत्तसेवा ):- गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांची सर्व मदार गोदावरी कालव्यांच्या आवर्तनावर अवलंबून आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा व पाण्याची बचत करून सिंचनासाठी एक उन्हाळी आवर्तन दया अशी आग्रही मागणी आ. आशुतोष काळे यांनी महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अथितीगृहात घेण्यात आलेल्या गोदावरी, मुळा, भंडारदरा, निळवंडे कालवा प्रकल्पाची उन्हाळी हंगाम आवर्तनाच्या नियोजन बैठकीत केली आहे.
या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात शेती सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता, नियोजन आणि वितरण याबाबत सखोल आढावा घेवून पाण्याचा काटकसरीने वापर व पाण्याची नासाडी होणार नाही याची काळजी घेवून पाण्याची बचत करण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्या. तोच धागा पकडत आ. आशुतोष काळे यांनी या बैठकीत सिंचनासाठी उन्हाळी आवर्तन मिळावे याबाबत मुद्दा उपस्थित करून आवर्तनाबाबत आग्रही मागणी केली.
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात मागील चार वर्षात झालेल्या पर्जन्यमानाच्या तुलनेत अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतातील चारा पिके व फळबागा दुष्काळी परिस्थितीत कशा जगवायच्या असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे बचत झालेल्या पाण्यातून एक उन्हाळी आवर्तन सिंचनासाठी मिळाल्यास लाभधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे सिंचनासाठी उन्हाळी आवर्तन मिळावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी लावून धरली. तसेच लाभधारक शेतकऱ्यांना सिंचन आवर्तना वेळी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी गोदावरी कालवे व चाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित करून लाभधारक शेतकऱ्यांनी भरलेल्या पाणी पट्टीच्या रक्कमेतून गोदावरी कालवे व चाऱ्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी देखील आ. आशुतोष काळे यांनी या बैठकीत केली.
या मागण्यांना पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या बैठकीसाठी खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, तर दूरदृश्य प्रणालीद्वारे आ. लहू कानडे, आ. मोनिका राजळे, आ. किरण लहामटे, आ. सत्यजित तांबे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जलसंपदा विभागाच्या सोनल शहाणे, स्वप्निल काळे, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता बाळासाहेब शेटे, सायली पाटील यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.