श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – आमदार लहू कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी आ. कानडे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया रचला. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्यात सहकारी संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. महाराष्ट्रात त्यांनी सहकाराचे जाळे निर्माण केले. पंचायत राजच्या माध्यमातून तळागाळातील समाजाला त्यांच्या लोकशाहीचे ताकदीचे भान देणारे ते द्रष्टा नेते होते. उपमुख्यमंत्री व उपपंतप्रधान म्हणून त्यांनी काम पाहिले. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते साहित्यिकही होते. युगांतर. सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ व ऋणानुबंध ही त्यांची साहित्यसंपदा असल्याचे आ. कानडे यांनी यावेळी म्हणाले.