शिर्डी, दि.२५ मे २०२३ (उमाका वृत्तसेवा) –सर्वसामान्य जनतेमध्ये कायद्याबद्दल जागरूकता आली पाहिजे. या उद्देशाने तालुका स्तरावर विधी जागरूकता शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. अशी माहिती राहाता कनिष्ठ स्तर न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश संदिप व्ही.खैरे यांनी आज येथे दिली.
राहाता तालुका विधी सेवा प्राधिकरण व पंचायत समिती यांचे संयुक्त विद्यमाने शेतमजूर, कामगारांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे बाभळेश्वर ग्रामपंचायत येथे गुरूवारी, आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घघाटन श्री.खैरे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राहाता गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, बाभळेश्वर गावाचे सरपंच विमलताई पुंजा म्हस्के, उपसरपंच अजित भाऊसाहेब बेंद्रे, लोहगावचे सरपंच शशिकांत पठारे, पंचायत समिती माजी उपसभापती बाबासाहेब पुंजा म्हस्के, शंकर रंगनाथ बेंद्रे व आण्णासाहेब भाऊ बेंद्रे आदी उपस्थित होते.
न्यायाधीश श्री.खैरे म्हणाले, तळागाळातील सर्वसामान्य माणसांना न्याय मिळाला पाहिजे. ही भावना न्यायपालिकेची आहे. या उद्देशाने गावपातळीपासून देशपातळीपर्यंत कायदेविषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. विधी सेवा समितीचे कामाबद्दल ही श्री.खैरे यांनी यावेळी माहिती दिली.
यावेळी गटविकास अधिकारी श्री.जालिंदर पठारे यांनी बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना, नोंदणी पद्धत तसेच बांधकाम कामगारांचे प्रकार व इतर कामगारांच्या कल्याणकारी योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. बाभळेश्वर येथील सोनाली अनिल खोबरे हीची नुकतीच मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी विस्तार अधिकारी एस.बी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य किरणकुमार आरगडे, अॅड. भास्कर पठारे, अॅड. बाळासाहेब बेंद्रे, अॅड. गोरक्ष म्हसे, अॅड. शेख, ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, वि.का.सो. चेअरमन दौलतराव बेंद्रे तसेच बाभळेश्वर, रांजणखोल, नांदुर, राजुरी, ममदापुर, तिसगाव, कोल्हार बु. भगवतीपुर, लोहगाव, पाथरे बु., पिंप्रिनिर्मळ, अस्तगाव येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, कामगार, शेतमजूर, बचत गट प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



