श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – कोणत्याही सरकारी योजनेचा ज्यावेळी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळतो तेव्हा ती योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होते. शहरात पत्रकार भवनाची देखणी वास्तू उभी राहिली आहे. या वास्तूमुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. तसेच स्मशानभूमीत बसविण्यात आलेल्या गॅस दाहिनीमुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
येथील प्रेस क्लबच्या पत्रकार भवनाचे उद्घाटन व स्मशानभूमीतील गॅस दाहिनीचे लोकार्पण आ. कानडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, समन्वयक प्रविण काळे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, संजय छल्लारे, राजेश अलघ, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, सचिव बाळासाहेब आगे, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, तसेच सतीश बोर्डे, नानासाहेब रेवाळे, राजेंद्र औताडे, प्रताप देवरे, दीपक कदम, जमीर शेख आदी उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, येथील पत्रकारांनी शहराचा लौकिक वाढविला आहे. ज्ञान, अनुभव, मनमिळाऊ व नेमके लिहिणाऱ्या पत्रकारांमुळे श्रीरामपूरच्या बातमीची वरपर्यंत दखल घेतली जाते. पत्रकारितेतील अभद्रपणा दूर करत येथील पत्रकारांनी चांगुलपणा जपला आहे. ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी आपण त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे. पुढील काळात पत्रकारांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू. आमदार निधीतून पत्रकार भवनाची सुंदर वस्तू उभी राहिली आहे. या ठिकाणी पत्रकारितेशी संबंधित कार्यक्रम व्हावेत, पत्रकार भावनांच्या वॉल कंपाऊंडसाठी निधी दिला आहे. या वास्तूच्या सुरक्षिततेसाठी व देखरेखीसाठी पालिकेने येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
स्मशानभूमीमधील विद्युत दाहिनीचा प्रश्न रेंगाळला होता. आपण आमदार निधीतून गॅस दाहिनीसाठी 25 लाख रुपये मंजूर करून गॅस दाहिनी बसविली आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. गॅस दाहिनी वापरासाठी नागरिकांची मने वळविण्याचा प्रयत्न करावा. नगरपरिषद हद्दीत आपण 22 कोटी रुपयांचे रस्ते केले आहेत. नेवासा बाभळेश्वर रस्त्यासाठी 167 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामामुळे शहराचे वैभव वाढविण्यात भर पडणार असल्याचे आ. कानडे यावेळी म्हणाले.
यावेळी सचिन गुजर, प्रेस क्लबचे सचिव बाळासाहेब आगे, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, रवींद्र गुलाटी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार प्रदीप आहेर, सलीमखान पठाण, तसेच अक्षय नाईक, भैय्या शहा. किशोर कांबळे यांच्यासह पत्रकार व नागरिक उपस्थित होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड यांनी प्रस्ताविक व स्वागत केले.