2.5 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

लोकप्रतिनिधींना खराब रस्त्याबाबत मतदार जाब विचारणार?. टाकळीभान —बेलपिंपळगाव रस्त्याची दयनीय अवस्था

टाकळीभान( जनता आवाज वृत्तसेवा ):—टाकळीभान बेलपिंपळगांव रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली असून लोकप्रतिनिधींना या रस्त्याकडे लक्ष देण्यास वेळ आहे की नाही? असा संतप्त सवाल या परिसरातील नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणूकीसाठी मताचा जोगवा मागायला येणार्‍यांना या विषयी जाब विचारला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

गेली अनेक वर्षापासून टाकळीभान येथून प्रभाग क्र. ४ व ५ मधून बेलपिंपळगावकडे जाणार्‍या रस्त्याची मोठी वाताहत झाली आहे. हा रस्ता फक्त नावाला उरला असून पुर्णपणे उखडला गेला आहे. प्रवास करताने प्रवाशांच्या नाकीनऊ येत असून अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावर घडले असून अनेकांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. या रस्त्याच्या दुर्दशेबाबत वारंवार बातम्या प्रसिध्द केल्या आहेत. तसेच विद्यमान आमदारांना टाकळीभान येथील एका स्नेहभोजना प्रसंगी निवेदनही दिले आहे.

मात्र तरी देखील या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले नाही. टाकळीभानची बाजारपेठ मोठी असल्याने परिसरातील अनेक गावांचा या रस्त्याने राबता आहे. मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. निवडणूका लागल्यानंतर मतांचा जोगवा मागण्यासाठी येणार्‍यांना निवडणूक झाल्यानंतर नागरीकांच्या गरजांचा विसरच पडतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खासदार, आमदार कुणीही या रस्त्याबाबत पाऊले उचलताना दिसत नाही. असे असतानेच आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. यानंतर विधानसभेच्या निवडणूका होतील. मात्र हा रस्ता कधी होईल? याचे उत्तर ग्रामस्थांना मिळत नाही.

लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मतांचा जोगवा मागण्यास येणार्‍या लोकप्रतिनिधींना अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांना या रस्त्याच्या कामाबाबत सवाल उपस्थित केला जाणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरीकांमधून उमटत आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!