संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-शाळा, महाविद्यालयीन जिवन हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्वाचा व सदैव स्मरणात राहणारा काळ असून याच शालेय जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी घुलेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयात सन २००३ – ०४ सालच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
शालेय जिवनात आपल्याला अनेक मित्र मैत्रीणी असतात. लहानपणीची अनेक वर्षे आपण त्यांच्या सोबत घालवितो. मात्र शालेय जिवन संपल्यानंतर प्रत्येकजण हा आपआपल्या क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल करीत असतो. यामुळे मागे वळुन बघायला वेळ मिळत नाही. आयुष्याच्या जबाबदारीची व्यापकता वाढत जाते. आणि आपण जुने दिवस विसरुन जातो. मात्र हा काळ आपल्या जिवनातील महत्वाचा असून त्या काळातील आपले शिक्षक, मित्र, मैत्रीणी यांना कधीतरी भेटावे, त्यांचेशी मनमोकळ्याा गप्पा माराव्यात. आपले सुख, दु:ख सांगावे आणि पुन्हा त्याच दिवसात रमून जावे, न असावे काळाचे आणि वेळेचे भान असे प्रत्येकालाच वाटत असते. हीच भावना जपत घुलेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयात सन 2003-04 सालच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.
अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर विविध क्षेत्रातील शंभरहून अधिक मित्र, मैत्रीणी एकत्र आल्या होत्या, सगळेच एका वर्गातील, एकत्र राहून लहानाचे मोठे होत गेले. एक वडापाव, एक डब्बा दोघांत खाणारे आज ही सर्व पाखरे पुन्हा त्याच छताखाली एकमेकांना अनेक वर्षानंतर भेटण्यासाठी गोळा झाली. पुन्हा तीच चिव चिव आणि सुख-दु:ख विसरून सर्वजण एकत्र आले. अनेक जणांनी आपापल्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली. आठवणींना उजाळा देतांना आनंदाश्रू, हास्य व भाव-भावनांचा एक अनोखा खेळ येथे रंगला होता.
या मेळाव्याला त्यावर्षीचे विद्यार्थ्यांना शिकवणारे सर्व विषयांचे गुरूवर्य शिक्षकही उपस्थित झाले, यामध्ये प्राचार्य जगताप सर, आरोटे सर, थिटमे सर, निकाळे सर, नाईकवाडी सर, वनपत्रे सर, रहाणे मॅडम, पारखे सर, बड सर, घोसाळे सर, कानवडे सर, शिंदे सर, गायकवाड सर, बनसोडे सर, रुपवते सर, मोकळ सर, सोनवणे सर, अभंग मॅडम यांनी अत्यंत मोलाचे आणि हसून खेळून मनोगत व्यक्त केले, आपले विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे, यांचा आनंद त्यांच्या चेहर्यावर यावेळी दिसून येत होता.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विशाल काळे, रवि राऊत, राजु दिघे, संतोष वाकचौरे, दुर्गा गायकवाड, ज्योती पानसरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल काळे यांनी केले तर आभार गोरक्षनाथ राऊत सर यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांनी घेतलेला स्नेह मेळावा कार्यक्रम दर्जेदार व अनुकरणीय – प्राचार्य जगताप
महात्मा फुले विद्यालयात सन 2003-04 सालच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम हा अतिशय दर्जेदार पद्धतीने झाला असून इतर बॅचच्या मुलांनी याचा आदर्श घेत हा उपक्रम राबवावा व आपल्या विद्यालयाचे नाव वाढवावे असे आवाहन यावेळी प्राचार्य जगताप सर यांनी केले.