आंबी ( जनता आवाज वृत्तसेवा) :- विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच करत असते. याच धर्तीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्लिश केसापूर (ता. राहुरी) चे वार्षिक कलाविष्कार स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी राहुरी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सातपुते, श्रीम. सिनारे, केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड, श्रीरामपूर गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम, जनरल मॅनेजर अरविंद डोखे, पोलिस उपनिरीक्षक गोविंद खरात, सरपंच सुशिलाताई दादासाहेब मेहेत्रे, चेअरमन ललित टाकसाळ, पोलिस पाटील विशाल पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मेहेत्रे तसेच राहुरी श्रीरामपुर, राहाता येथील शिक्षक वर्ग उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी शिवगीते, भीमगीते, चित्रपट गीते, समाजप्रबोधनपर नाटिका आदी विविध कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी पालकांनीही खिसा रिकामा करत हजारो रुपये बक्षीस दिले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्रीम. कोळपकर, शिक्षक गीतांजली कारले, श्री. दळवी, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी आजी माजी सरपंच, सदस्य, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील विविध पदाधिकारी, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना रुचकर भोजन देण्यात आले.