संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):–साकुर भागातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा लवकरात लवकर पूर्ण तपास करून सर्व दोषींवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांनी केली असून त्यांनी साकुर येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
जयहिंद महिला मंच व एकविरा फाउंडेशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना देण्यात आले. यावेळी कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात ,महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते , सौ अर्चनाताई बालोडे, सौ निर्मलाताई गुंजाळ , सौ.पद्माताई थोरात , सौ बेबीताई थोरात, सौ सुनीता कांदळकर , सुरभी मोरे, तृष्णा आवटी, तपस्या देशमुख आदींसह विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
साकुर येथे पीडित कुटुंबीयांना भेट दिल्यानंतर डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, झालेली घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे . या घटनेचा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनीही तीव्र निषेध केला आहे.या घटनेतील सर्व आरोपींना तातडीने कडक शिक्षा झाली पाहिजे. त्यांना जामीन मिळता कामा तसेच मुलीचे आई-वडील व कुटुंबीय भयग्रस्त झाले असून त्यांना सरकारकडून संरक्षण व मदत मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
तर संगमनेर येथे एकविरा फाउंडेशन व जयहिंद महिला मंच वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साकुर येथे अल्पवयीन असलेल्या इयत्ता दहावीच्या मुलीवर झालेली अत्याचाराची घटनाही अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून यातील आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. याचबरोबर या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र पोलीस महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी तसेच यातील सर्व आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा झाली पाहिजे.
याचबरोबर या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना शासनाकडून संरक्षण मिळावे व तसेच त्यांना मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून यावर संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे आणि एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात व जयहिंद महिला मंच आणि एकविरा फाउंडेशनच्या विविध महिला भगिनींच्या सह्या आहेत.