राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- भारतीय किसान मंत्रालय, भारतीय कृषि प्रणाली संस्था मोदीपूरम व अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती प्रकल्प, मफुकृवि, राहुरी यांचे संयुक्त विद्यमाने पीक विविधीकरण या पथदर्शी प्रकल्पाद्वारे अहमदनगर जिल्हयातील कृषि अधिकार्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा प्रकल्प राबविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे व विभाग प्रमुख कृषिविद्या डॉ. आनंद सोळंके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
हा पथदर्शीय पीक विविधीकरण प्रकल्प महात्मा फुले कृषि विदयापिठाच्या कार्यक्षेत्रात येणार्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हयात राबविला जात आहे. या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कृषिविद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, कार्यक्रमाचे आयोजक तथा एकात्मिक शेती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास सुर्वे, श्रीरामपुरचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री. अमोल काळे, तालुका कृषि अधिकारी श्री. अविनाश चंदन, राहुरीचे तालुका कृषि अधिकारी श्री. बापूसाहेब शिंदे, मृदशास्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे व कृषिविद्यावेत्ता डॉ. नितीन उगले उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ सुनिल गोरंटीवार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की बदलत्या वातावरणात एकात्मिक शेती तसेच योग्य पीक पध्दतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. यावेळी डॉ. श्रीमंत रणपिसे व डॉ. सी.एस. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणा दरम्यान डॉ. अनिल दुरगुडे यांनी जमीन आरोग्य व्यवस्थापन, डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी यांत्रिकीकरण काळाची गरज, डॉ. भरत पाटील यांनी उन्हाळी भाजीपाला पिके लागवड, डॉ. सचिन नलावडे यांनी ड्रोनचा फवारणीसाठी वापर, डॉ. सुभाष घोडके यांनी उस लागवड तंत्रज्ञान, श्री. सोमनाथ तोडमल यांनी नविन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व डॉ. उल्हास सुर्वे यांनी एकात्मिक शेती, सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. उल्हास सुर्वे यांनी पीक विविधीकरणाच्या प्रकल्पाची पार्श्वभूमी सांगितली.
यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातून ४५ कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक व कृषि अधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. बाळासाहेब जाधव, श्री. दिगंबर पाटील व सेद्रीय शेती प्रकल्पातील सर्व कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.