राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी आठच्या सुमारास येथील ढगे वस्ती परीसरात ही घटना घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज गुरुवार (दि. २३) रोजी सकाळी आठच्या सुमारास वेदिका श्रीकांत ढगे ही दोन वर्षीय बालिका अंगणात खेळत होती. जवळच असलेल्या गिन्नी गवतात बिबट्या लपून बसलेला होता. यावेळी बिबट्याने अचानक बालिकेवर हल्ला केल्याने घरातील सर्वांनीच आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने बालिकेला सोडून पलायन केले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीरित्या जखमी झाल्याने कुटुंबियांनी व आजूबाजूच्या नागरीकांनी तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पंरतु, त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, यावेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे, वनरक्षक सतीश जाधव, गाडेकर, आदी कर्मचारी हे अडीच तास उशिरा रवाना झाले.राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा संचार वाढला असून तालुक्यातील खेडोपाडी वाड्या, वस्त्यांवर बिबट्यांची वर्दळ वाढलेली आहे. राहुरी तालुक्यात वरवंडी सारख्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर वनविभागाने येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.