श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा ): – ‘ माता न तू वैरिणी…’ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा या गावात उघडकीस आली. चक्क अज्ञात आईनेच तासभरापूर्वी जन्मलेल्या पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर फेकून पाेबारा केला. ही हृदय पिळवटणारी घटना शुक्रवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास उजेडात आली. पोलिसांनी देवदूताच्या रूपात येऊन नवजात बालकाला ताब्यात घेत नवे जीवनदान दिले. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून पोलिसांकडून माता-पित्यांचा शोध सुरू आहे.
मात्र, चक्क आपल्या तान्ह्या बाळाला आईने शिरसगाव बोडखा येथील अनिल जहागीरदार यांच्या घरापाठीमागे फेकून दिल्याने मुलीसारखी मुलगा ही नकोसा का झाला असावा, असा प्रश्न या घटनेतून उपस्थित होतो आहे. पोटच्या बाळाला फेकून देणं त्या निर्दयी अज्ञात मातेला खरंच काही वाटलं नसेल का, विशेष म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर येताच या बाळाचा संघर्ष सुरु झालेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शिरसगाव बोडखा येथील रहिवासी अनिल जहागीरदार यांचे घर गावाच्या थोड्या दूर अंतरावर आहे. त्यांची पत्नी पहाटेच उठली असताना घराच्या मागील परिसरातून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत पाहणी केली असता त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.
अवघ्या काही तासापूर्वी जन्मलेले बाळ त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी तत्काळ याची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांना माहिती मिळताच घोंगडे व साखरे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नवजात बालकाला ताब्यात घेतले आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी निर्दयी अज्ञात माता-पित्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीसानी दिली.
निर्दयी माता गावातीलच?- पहाटेच्या सुमारास नवजात बालकाला शिरसगाव बोडखा येथील अनिल जहागीरदार यांच्या घरापाठीमागे फेकून देण्यात आले. हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला तर आले नसेल ना, असा प्रश्न गावकऱ्यांमध्ये आहे. गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून पोलीस त्या निर्दयी मातेचा शोध घेत आहेत. ती निर्दयी माता गावातीलच रहिवासी असेल, असा संशय पोलिसांना असून त्या दिशेने तपास सुरू आहे.