श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- हॉटेल मालकाला जेवण मागीतल्यानंतर त्याने रात्रीचे 11 वाजले असून हॉटेल बंद झाल्याचे सांगून जेवण मिळणार नाही, असे म्हटल्याचा राग आल्याने चार जणांनी हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात हॉटेल मालक मनोज गोरे रा.कमालपूर, ता.श्रीरामपूर हा गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी चार आरोपींवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजु अमृत बोडखे,दत्तात्रय नानासाहेब कांगुणे दोघे रा. घुमनदेव, ता.श्रीरामपुर,सागर पाडुरंग पठाडे,सनी उर्फ रितेश खंडेराव जाधव रा. टाकळीभान ता.श्रीरामपुर अशी आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादंवी कलम 307, 324,323,504,506,427,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत हॉटेल मालक मनोज यांचे भाऊ अशोक राजेंद्र गोरे वय 39,रा.कमालपुर,ता. श्रीरामपुर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की,दिनांक 22 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान कमालपुर गावच्या शिवारातील श्रीरामपुर-कमालपूर रस्त्यावरील हॉटेल निसर्ग येथे भाऊ मनोज गोरे हे बसलेले असताना तेथे आरोपी राजु अमृत बोडखे,दत्तात्रय नानासाहेब कांगुणे,सागर पाडुरंग पठाडे,सनी उर्फ रितेश खंडेराव जाधव हे चौघे आले व त्यांनी जेवण मागीतले. त्यावेळी मनोज गोरे हे त्यांना म्हणाले की, हॉटेल बंद झाले असुन तुम्हाला जेवण मिळणार नाही.याचा आरोपींना राग आल्याने आरोपी राजु बोडखे याने मनोज याचे दोन्ही हात पकडले.दुसरा आरोपी दत्तात्रय कांगुणे याने मनोज याचा गळा घट्ट दाबून धरला व सागर पठाडे याने त्याच्या हातातील धारदार चाकुसारखे हत्याराने मनोज गोरे याच्या डाव्या बाजुच्या बरगडीवर त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले.यावेळी अशोक गोरे यासही आरोपींनी लाथाबुक्याने जबर मारहाण करुन जिवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान या जीवघेण्या हल्ल्यात मनोज हा जबर जखमी झाला असून त्यास लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोसइ आर एस मुंतोडे हे करीत आहेत.