पाथर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ): – तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष, सूर्यदेव आग ओकत असल्याने सावलीसाठी झाडही सापडेना, अख्खा तालुका टँकरने पाणी पितोय, सुगीच्या दिवसात झाडे लावा झाडे लावा म्हणून ढोल पीटणारा वनविभाग हल्ली मात्र संध्याकाळी हॉटेलवर झिंगत पडलेला दिसतोय.
आर्थिक हितसंबंध आपले आपले सोयीचे गणित पाहणारा वनविभाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात अत्यंत कडक भूमिका घेणारा वनविभाग आता लाकूडतोड्यांसाठी लोण्यापेक्षाही मऊ भूमिका काय घेतोय? नक्कीच यामागे मोठे अर्थकारण दडले आहे.
वर्षानुवर्ष याच ठिकाणी रमलेले वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी यामागचं गणित सुटताना लाखो झाडांचा दरवर्षी बिंनदिक्कतपणे बळी जात आहे. बिबट्याला रानडुकरे आली. वनविभागाला फोन करा, संकट समयी वनविभाग मात्र जंगलात मंगल करताना आढळून येतो. भर उन्हाळ्यात मात्र तालुक्यात दररोज दोन ते तीन ट्रक भरून वृक्षतोड होत आहे. याकडे लक्ष द्यायला पाथर्डी वनविभागाला वेळ नाही. यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून कळविले असता ते फोन ऐकण्याचे सोपस्कार पार पडतात. खबरदार वनसंपदाही राष्ट्राची संपत आहे.
अन आमच्या साधू संतांनी सांगून ठेवलेले आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी त्यामुळे येत्या कालावधीमध्ये वनविभागाने वृक्षतोड थांबवली नाही तर, वन विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा वृक्ष प्रेमींनी दिला आहे.