पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- खा. नीलेश लंके यांचे समर्थक स्वीस सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला आहे. यामुळे पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली.
लोकसभा निवडणुकीत नगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवला. भाजपचे विद्यमान खा. सुजय विखे पाटील यांचा लंके यांनी पराभव केला. या विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण पेटले आहे. दोन्ही बाजूचे समर्थक आमनेसामने आले. लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला आहे.
लोकसभा निवडणुकांनंतर पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. लंके यांच्या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्या वाहनावर पारनेर बस स्थानकाजवळ हल्ला झाला. या हल्ल्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने त्यांना जास्त इजा झालेली नाही.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लंके समर्थक घटनास्थळी जमा झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
निकाल लागल्यापासून पारनेर तालुक्यातील वातावरण तणाव पूर्ण बनलेले आहे. समाज माध्यमावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. आरोप प्रत्यारोपोतूनच वादावादी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने होणाऱ्या व्हायरल पोस्टवर निर्बंध घालावे अशी मागणी होत आहे. हल्ला कोणी केला याचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे.