कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ): – नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि सोलापूर येथील कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात देखील पथकाच्या माध्यमातून चौकशी सुरू करण्यात आली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर विवेक कोल्हे यांच्या विरोधात ही कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांचे नाम साधर्म्य असणारे किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
तसेच ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे यांचे नाम साधर्म्य असणारे संदीप नामदेव गुळवे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाआघाडीला दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवारांचे आव्हान अद्याप कायम आहे. त्यामुळेच सरकारच्या वतीने धाडी टाकून दबाव टाकण्यात आल्याची चर्चा देखील होत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. त्यात आता विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आल्याने यात भर पडली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेण्याचा दबाव टाकण्यासाठी हे सर्व होत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.