कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- सद्या आमचा काळ बाईट आहे, पण आमचा वारसा संघर्षाचा आहे. कोणा प्रवृत्तींना बळ देण्यासाठी आम्हाला त्रास देणार असाल तर लक्षात ठेवा संघर्षाचा वारसा घेऊन या प्रवृत्तींच्या विरोधात आम्ही शिक्षकांना बळ देऊ, असा खणखणीत इशारा भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी किशोर दराडे यांना दिला आहे.
कोल्हे यांनी विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे महायुतीकडून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे कोल्हे यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांवर राज्याच्या काही यंत्रणांकडून छापेमारी करण्यात आली. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आता कोल्हे यांनी यावर भाष्य करीत उमेदवार दराडे यांना इशारा दिला आहे.
केलेल्या चौकशीत त्यांना काय आढळून आले, हे त्यांची त्यांनाच माहिती. मात्र, यावरून एक स्पष्ट होते की हे आमदार किशोर दराडे यांच्यासारख्या प्रवृत्तींना बळ देत आहेत. कोपरगावमधील आमच्या परिवाराच्या विविध संस्थांवर अशी कारवाई प्रथमच झाली आहे. मी निवडणुकीत माघार घ्यावी, यासाठीच हे दबावतंत्र असल्याचे दिसून येते.
सरकारी यंत्रणेचा हा दुरूपयोग आहे. यापूर्वी आम्ही छापेमारीच्या बातम्या ऐकल्या होत्या. आता कारण नसताना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत. तेही यांच्या काळात हा अनुभव आला. ज्यांना बळ देण्यासाठी सर्व घडवून आणतत आहेत, त्यांची पार्श्वभूमी त्यांनी तपासावी. काहीही झाले तरी या प्रवृत्तीच्या विरोधात मी शिक्षकांसोबत ठाम राहणार आहे, असेही कोल्हे म्हणाले.