कोल्हार (वार्ताहर) : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील सरपंच सौ. अनिता दिगंबर पाटील यांचे पती ग्रामपंचायत कारभारात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप करून शासनाच्या नियमांचा भंग करत असल्याचे पत्र येथील ग्रामपंचायतच्या विरोधी सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात या सदस्यांनी म्हटले आहे की, कोल्हार खुर्दच्या सरपंच अनिता शिरसाठ यांचे पती हे ग्रामपंचायतच्या कारभारात ढवळाढवळ करत असून त्यांच्या हस्तक्षेपामुळे ग्रामपंचायत कारभारावर विपरीत परिणाम होत आहे. ते ग्रामपंचायत कामगार तसेच ग्रामसेवक यांना सतत सूचना करतात. तरी त्यांचेवर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर भारती सदानंद शिरसाठ, स्वाती संदीप बनकर, सविता दत्तात्रय लोंढे, प्रकाश भाऊसाहेब शिरसाठ, संदीप विजय भोसले, दिलीप सखाहरी कानडे या सहा ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.



