संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ): – अकोला जिल्हा परिषदेत कार्यरत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माझा लैंगिक छळ केलाय, ‘त्यांच्या’वर तत्काळ गुन्हा दाखल करून माझ्यावर होणारा लैगिंक छळ थांबवावा, अशी आर्त हाक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.
अकोला जिल्हा परिषदेत कार्यरत उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अकोटचे गटविकास अधिकारी व अकोल्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी व सध्या कार्यरत असलेले गटविकास अधिकारी यांच्यावर एका ग्रामसेविकेने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
या दोन्ही अधिकाऱ्यांनी माझ्या कामाच्या ठिकाणी लैंगीक छळ केला असून माझे जगणे खूप लाजीरवाने केलेले आहे, असा आरोप केला आहे. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करून कामाच्या ठिकाणी माझा होणारा लैगीक छळ थांबवावा व त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सदर ग्रामसेवक महिलेने केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्याकडे ग्रामसेवक महिलेने धाव घेत आपबिती सांगितली. यावेळी जिल्हा परिषेदचे माजी पदाधिकारी राजीव बोचे उपस्थित होते.
तर घटनेतील एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असून दुसऱ्यावर अद्याप पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. पोलिस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आपण चौकशी करून उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ग्रामसेविकेने केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी हे प्रकरण विशाखा समितीकडे सोपवले असून चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.