शिर्डी,( जनता आवाज वृत्तसेवा ):-नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि आग्रहामुळे वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघातील ४० बुथ वरील ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅटची मोजणी आपण निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
सर्वौच्च न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांना आधिन राहुन दिलेल्या विहीत मुदतीत आपण आयोगाकडे या मागणीचा अर्ज दाखल केला असून, यासाठी आयोगाकडे नियमाप्रमाणे १८ लाख ८८ हजार रुपयांची फी जमा केली असल्याचेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणूकीत मला दुस-या क्रमांकाची मते मिळालेली आहेत. सदरील निकाल आम्ही स्विकारलेला आहेच, परंतू मतदार संघातील माझे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांची असलेली भावना आणि आग्रह लक्षात घेवून एकुण ४० बुथ वरील व्हीव्हीपॅट पुन्हा मोजण्याची मागणी आपण केली आहे. यामध्ये राहुरी, कर्जत जामखेड, नगर शहर या भागातील प्रत्येकी पाच बुथ आणि श्रीगोंदा व पारनेर या विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी दहा बुथ यासाठी निवडण्यात आले. आयोगाने निवडणूक निकाला बाबत तक्रार दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. या मुदतीच आपण हा अर्ज सादर केला असून, या अर्जाबाबत आयोग निर्णय घेईल असेही डॉ.विखे पाटील यावेळी म्हणाले.