संवत्सर( जनता आवाज वृत्तसेवा ):-राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका हे केवळ कर्तव्य नसून एक विशेषाधिकार आहे. बदलाचे शिल्पकार आणि उज्ज्वल उद्याचे निर्माते होण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे. अशा तरुणांना वेगवेगळ्या संधीसह सक्षम करणे, त्यांचा राजकीय, सामाजिक सहभाग वाढविणे आणि त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण करणे या प्रक्रियेतूनच समृध्द राष्ट्राचा मार्ग मोकळा होण्यास मदत होऊ शकते असे प्रतिपादन पुणे येथील ई. एन. टी. सर्जन व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ. मिलींद भोई यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात केले.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या २० व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून ‘ राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग..’ या विषयावरील व्याख्यानातून डॉ. मिलींद भोई बोलत होते. पुणे येथील शिक्षणतज्ज्ञ अनिलराव गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, पाटबंधारे विभागातील माजी उपअभियंता साहेबराव सैद, माजी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, रामचंद्र म्हस्के, प्रकाश चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी पंडितराव वाघिरे, कृषी विकास अधिकारी बाळासाहेब साबळे, कृष्णराव परजणे, श्रीमती देऊबाई परजणे, सौ. वैशालीताई भोई, सौ. लताताई गुंजाळ यांची उपस्थिती होती. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले.
युवकांच्या शक्तीचा राष्ट्र उभारणीसाठी उपयोग करुन घ्यायचा असेल तर, त्यांच्यातली उर्जा, नाविन्यपूर्ण कल्पना, अद्वितीय दृष्टीकोन याचा वापर कसा करुन घेता येईल याचा सर्वार्थाने विचार व्हावयास हवा. खरेतर तरुणाई हे राष्ट्राचे मौल्यवान साधन आहे. युवकांमधले सामर्थ्य आणि क्षमता ओळखून त्यांचा वापर योग्य पध्दतीने करुन घेतला तर राष्ट्राच्या विकासासाठी चांगला हातभार लागू शकतो असे सांगून डॉ. भोई पुढे म्हणाले. देशाचे भविष्य आणि वर्तमान युवा शक्तीच्या हातात असल्याने युवकांचा सहभाग या प्रक्रियेत अत्यंत महत्वाचा आहे. नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील विचाराला कल्पनाशक्तीची जोड दिली तर एका नव्या राष्ट्राला आकार देता येतो हा विचार आजच्या युवकांमध्ये रुजायला हवा अशीही अपेक्षा डॉ. भोई यांनी व्यक्त केली.
महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून स्व. नामदेवराव परजणे पाटील आण्णा यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीविषयीच्या अनेक आठवणी विषद केल्या. आण्णा हे चालते बोलते विद्यापीठ होते. कुणाच्या धर्माच्या किंवा पंथाच्या विचाराची त्यांनी कधी प्रतारणा केली नाही. शेतकरी हाच त्यांचा खरा धर्म होता. शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अविरतपणे संघर्ष केला. जीवनात अनेक संकटे आलेली असतानाही त्यावर मात करुन खंबिरपणे ते उभे राहिले. अनेक संस्था उभ्या करुन त्यामाध्यमातून सामाजिक, राजकीय मूल्यांची जपणूक त्यांनी केली. अशा त्यागी पुरुषांचे कार्य आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आजच्या चंगळवादी परिस्थितीमध्ये जुन्या पिढींच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे. आपला देश जागतिक महासत्ता बनण्याच्यादृष्टीने वेगाने वाटचाल करीत आहे. शासनाकडून केंद्रीयस्तरावर विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. नवे तंत्रज्ञान आणि नवे विचार आत्मसात करण्यासाठी आपला युवक तत्पर असला तरी, त्यांच्या क्षमतेला प्रात्साहन देण्याची गरज आहे. यासाठी युवकांमध्ये सकारात्मक उर्जा जागृत करुन दिल्यास ते त्यांच्या ध्येयापर्यंत निश्चितपणे पोहोचू शकतील असेही मार्गदर्शन ना. विखे पाटील यांनी युवकांना केले.
याप्रसंगी शिक्षणतज्ज अनिलराव गंजाळ, शालिनीताई विखे पाटील यांचीही भाषणे झालीत. नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या ” गोदानाम संवत्सरे ” या नियतकालिकेचे प्रकाशन ना. विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच संवत्सर व कोपरगांव येथील महिला महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशाचेही वितरण करण्यात आलेत. कु. ज्ञानेश्वरी मच्छिंद्र लोहकणे या विद्यार्थीनीने संस्कृतमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तर दहावी परीक्षेत कोपरगांव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिचाही पाहुण्यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. समोसरची उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले.