कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ):-कोपरगांव शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरी रॅकेटचा पर्दाफाश करत तब्बल १२ लाख ७७ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या २४ दुचाकी हस्तगत करत दोघांना गजाआड केले आहे. या दमदार कामगिरीचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की प्रकाश सुखदेव कांगणे (रा. निवारा, कोपरगाव ता. कोपरगाव) यांच्या घरासमोरुन दुचाकी (क्र. एम एच. १५, एच जे. ८२१३) व त्यांच्या शेजारील नितीन नाथू लष्करे यांचीही दुचाकी (क्र. एम एच. १७, सी एफ. ०४३१) अशी दोन वाहने अज्ञात चोरट्याने लांबवल्या होत्या. याबाबत प्रकाश कांगणे यांचे तक्रारीवरुन कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याचा तपास सुरु असताना पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की श्रावण सखाराम वाघ (रा. सोमठाणे जोश, ता. येवला, जि. नाशिक) याच्याकडे चोरीची मोटारसायकल आहे.
त्यावरून पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोहेकॉ. बी.एस. कोरेकर, डी. आर. तिकोणे, जालिंदर तमनर, अर्जुन दारकुंडे, पोकॉ. गणेश काकडे, श्रीकांत कुऱ्हाडे, महेश फड यांचे पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. हे पथक संशयित आरोपीचा शोध घेत असताना श्रावण सखाराम वाघ (वय ५६, रा. सोमठाणे जोश, ता. येवला, जि. नाशिक) यास त्याच्या गावातून ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चोरीच्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता कृष्णा प्रकाश शिंदे (रा. इंदिरानगर, कोपरगाव) याने कोपरगाव परिसरातून चोरलेल्या मोटारसायकल माझ्याकडे विक्रीसाठी आणून दिल्या असून दोन मोटारसायकली माझ्याकडे आहे अशी कबुली दिली. त्यावरून त्याच्या घराजवळ लावलेल्या दोन मोटारसायकली वाघ याच्याकडून हस्तगत केल्या.
सदरच पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे दोन वेगवेगळे पथक तयार करुन मोटारसायकल चोरी करणारा आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे याचा शोध घेत असताना मोटारसायकलवरुन पळून जात असताना पथकाला दिसला. तत्काळ पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चोरीच्या मोटारसायकलीबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास विश्वासात घेऊन त्याने कोपरगाव शहरातून विविध ठिकाणावरुन वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकली चोरी केल्या असल्याची कबुली दिली. त्यानंतर सर्व मोटारसायकली या श्रावण वाघ याच्याकडे दिल्या असल्याचे सांगितल्याने अटक करुन दोघांचीही समोरासमोर विचारपूस करुन तपास केला असता आरोपी कृष्ण शिंदे याने कोपरगाव शहरात व परिसरातून चोरलेल्या मोटारसायकली आरोपी श्रावण वाघ याच्याकडे विक्रीसाठी दिलेल्या आढळल्या. त्याच्याकडून तब्बल 12 लाख 77 हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या 24 दुचाकी हस्तगत केल्या. या दमदार कामगिरीचे नागरिकांतून कौतुक होत आहे.