लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा):-कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन शनिवार पासून सुरु करण्यात आले. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तसेच लाभक्षेत्रातील पाण्याच्या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून हे आवर्तन सोडण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सद्य परिस्थितीत भंडारदरा लाभक्षेत्रात पावसाचे आगमन म्हणावे तसे झाले नाही. सर्वच तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचणही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पावसाचे आगमन अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याने ग्रामीण भागातील बंधारे ओढे-नाले कोरडे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे आवश्यकता असल्याने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आवर्तन करण्याबाबतचा निर्णय 11 मार्च 2024 रोजी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
नियोजनाप्रमाणे शनिवार पासून पाण्याचे आवर्तन भंडारदरा धरणातून सोडण्यात आले असून, या आवर्तनाचा मोठा दिलासा लाभक्षेत्रातील गावांना होणार आहे. या आवर्तनामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून, आषाढी वारीसाठी पायी निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांनाही या आवर्तनाचा लाभ घेता येईल. सदर आवर्तन हे पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच नागरीकांनी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले आहे.




