शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-नासिक विभाग शिक्षक मतदार संघात आ.किशोर दराडे यांना विजयी करून शिक्षक मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला आहे. या विजयाने महायुतीत नवा आत्मविश्वास निर्माण झाला असल्याची प्रतिक्रीया महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आ.किशोर दराडे यांच्या विजयाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिंनदन करून शिक्षक मतदारांचे आभार मानले आहेत. झालेला विजय महायुतीसाठी नवा आत्मविश्वास देणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून परसवलेल्या खोट्या नॅरेटिव्हला मतदार फारकाळ साथ देत नाहीत हेच या निकालाने दाखवून दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत वेळोवेळी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेला शिक्षक मतदारांनी पाठबळ दिले असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने नकारात्मक भूमिकेतून मतदारांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. याला उत्तर देण्याची शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही मोठी संधी होती. जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आ.किशोर दराडे यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. सुज्ञ मतदारांनीही महायुतीच्या भूमीकेला साथ दिल्याने हा विजय मिळाला. आगामी विधानसभा निवडणूकीतही महायुती अशाच आत्मविश्वासाने मोठा विजय संपादन करेल असे मत त्यांनी व्यक्त केले.




