नगर( जनता आवाज वृत्तसेवा ):- राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस २६ जून निमित्त आयोजित जयंती पर्वात ९०२ जात वैधता प्रकरणे निकाली काढण्यात आली. अहमदनगर जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जात वैधता प्रमाणपत्रांची ही प्रकरणे निकाली काढण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी २६ जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जून २०२४ ते २ जुलै २०२४ या कालावधीत राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.
राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व कालावधीत समितीने त्रुटी पूर्तता कॅम्प आयोजित केला. त्यामध्ये ४३८ विद्यार्थी-पालकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी २५० विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता करून त्यांना वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहे. तसेच सदर कालावधीत नियमित प्राप्त होणाऱ्या प्रकरणांची छाननी करून समितीने जयंती पर्वाचे औचित्य साधून ६५२ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या ई-मेलवर पाठवले आहेत. असे जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने कळविले आहे.