संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- डॉ. आर. एस गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संस्थेच्या कृषी व्यावसाय व्यवस्थापन महाविद्यालय, संगमनेर (गुंजाळवाडी पठार) येथील अंतिम वर्षात शिकत असलेल्या कृषीदूतांच्या माध्यमातून कृषी दिनाचे औचित्य साधून सेंद्रिय शेती, रासायनिक शेतीचे दुष्परिणाम, पिकांवरील रोग व कीड नियंत्रण याविषयी चर्चासत्राचे आयोजन धांदरफळ येथे करण्यात आले.
या चर्चासत्रात कृषी सहाय्यक नारायण घुले यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे, पिकांवरील रोग व कीड नियंत्रण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रासायनिक शेतीचे मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम, वृक्षारोपन हि काळाची गरज, शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना या विषयी त्यांनी उपस्थितांना माहित दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम देशमुख आणि सूत्रसंचालन वैष्णवी खातोडे या विद्यार्थांनी केले.
यावेळी धांदरफळ गावचे सरपंच उज्वला देशमाने, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक कापडणीस, कृषी व्यावसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्रा. डी. बी. गोलांडे, अंतिम वर्षात शिकत असलेले सर्व कृषीचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी डॉ. आर. एस गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संस्थेचे सचिव राहुल गुंजाळ, वृंदावन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. उंबरकर यांनी प्रयत्न केले.