नेवासा(प्रतिनिधी) :- त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान नेवासा फाटा येथे विश्व हिंदु परिषद दुर्गावाहिनी पश्चिम महाराष्ट्र प्रशिक्षण वर्गास नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी येथील दुर्गांशी संवाद साधला ते म्हणाले, आजच्या दुर्गांनी राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्या देवी होळकर यांचा आदर्श घ्यावा.
विहिंपचे केद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांच्या कडुन मिळालेल्या निमंत्रणाचा सन्मान करुन ते आले होते. लव जिहाद बद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मुलींनी या षडयंत्राला बळी पडू नये, असे ते म्हणाले. द केरला स्टोरी हा चित्रपट केरळच्या वास्तविक घटनेवर आधारित असुन सर्वांनी हा बघावा, अशी विनंती केली व समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विखे पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आपला जन्म झाला आहे. आपन हिंदू आहोत, ही भाग्याची गोष्ट आहे. उद्याच्या दुर्गा तयार करण्याचे काम विश्व हिंदू परिषद करत आहे. भविष्यातील संकट मोठे आहे. त्यामूळे मुलींनी कुठल्याही षडयंत्राला बळी पडू नये. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. भारत मातेचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर रहावे. शेवटी त्यांनी भारत माता की जय, वन्दे मातरम् च्या घोषणा दिल्या व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री संजयजी मुदराळे, केंद्रीय बालसंस्कार प्रमुख श्रीमती किशोरी कोळेकर, नगर विभाग मंत्री सुनिल खिस्ती, दूर्गावाहिनीच्या प्रांत संयोजिका अमृता नळकांडे, प्रांत मठमंदिर सहप्रमुख जयप्रकाश खोत, वर्गाधिकारी पार्वतीताई नानेकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री श्रीकांत नळकांडे, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते विश्वनाथ नानेकर, विश्व हिंदू परिषद नेवासाचे प्रखंड मंत्री प्रशांत बहिरट, दुर्गावाहिनी जिल्हा संयोजिका ऍड. पल्लवी कांबळे, भाजपाचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सचिन देसार्डा, प्रताप चिंधे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



