नगर ( जनता आवाज वृत्तसेवा):-राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याची माहीती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.१जुलै पासून हे दर लागू होणार असून,दूध पावडरसाठी प्रतिकीलो ३०रुपये अनुदान देण्यावरही आजच्या बैठकीत शिक्कमोर्तब करण्यात आले.
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्यभरातील सहकारी तथा खासगी दूध उत्पादक संघ, आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीची बैठक मंत्रालयात बोलावली होती.सदर बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकरी, आणि दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या मागण्या विचारात घेता राज्यातील सर्व खासगी तथा सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रु. भाव देण्याचे सर्वानुमते निश्चित केल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर शासन शेतकऱ्यास 5 रुपये प्रतिलिटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल. जेणे करून शेतकऱ्याला प्रतिलिटर 35 रुपये मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे मंत्री विखे पाटील आशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली होती.
आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते या निर्णयाला संमती दर्शवली. लवकरच याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला जाईल असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
शासन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.