लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगोत्री खेडोपाडी पोहोचवण्यात संस्थेचे आणि शिक्षकांचे खूप मोठे योगदान आहे. पुणे आणि मुंबई येथे मिळणारे सर्व शिक्षण आज प्रवरा परिसरात उपलब्ध झाल्याने प्रवरेचा विद्यार्थी हा जगतिक पातळीवर पोहचला आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलचा ६० वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ.विखे पाटील बोलत होत्या.यावेळी प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे,उपप्राचार्य श्री. के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम एस जगधने, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शुभांगी रत्नपारखी आदीसह पालक उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून दि. ६ जुलै १९६४ रोजी प्रवरानगर येथे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पहिल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. विद्यालयाचा ६० वा वर्धापन दिन विविध स्पर्धा व उपक्रमांच्या साहाय्याने साजरा झाला. या कार्यक्रमप्रसंगी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा २०२४ मध्ये यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर शालेय मैदानावर विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. प्राथमिक विभागाच्या मनोरंजनात्मक खेळांनी विशेष लक्ष वेधले. तर शालेय विद्यार्थिनींची संगीत खुर्ची खूप गमतीदार झाली. शिक्षक विरुद्ध विद्यार्थी क्रिकेटचा सामना अतिशय रोमहर्षक व रोमांचक झाला. तर उच्च माध्यमिक विद्यार्थिनींचा व महिला शिक्षिका यांचा ‘थ्रो बॉल’ चा सामना अतिशय जल्लोषात पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभा घोलप तर आभार समन्वयक .एम.बी अंत्रे यांनी मानले.