शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- शिर्डी येथील साई वसंत विहार हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर डी. वाय. एसपी. शिरीष वमने यांच्या पथकाने छापा टाकला असून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहारमध्ये एक इसम वेश्या व्यवसायाकरिता तीन मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून आहे. याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी साई वसंत विहार हॉटेलमध्ये एक बनावट ग्राहक तयार करून पाठविले. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीस सदर बनावट ग्राहक यांनी शारीरिक सुखाची मागणी केली असता, त्या व्यक्तीने त्याच्या हॉटेलमधील मुली दाखवून बनावट ग्राहकास शारीरिक सुखाच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली.
याबाबत पथकातील पोलीस अधिकारी व पंचांची खात्री होताच साई वसंत विहार हॉटेलमध्ये छापा टाकला. यावेळी तीन मुलींना ताब्यात घेतले.
वसंत विहार हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालवणारा आरोपी शुभम अशोक आदमाने (वय 27, रा. कापूस वडगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यास ताब्यात घेतले आहे. तसेच त्याचा साथीदार नाना शेळके हा फरार झाला आहे.
तीनही पीडित मुलींना पुढील कारवाई करिता महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांच्यासोबत शिर्डी पोलीस ठाण्यात आणले आहे.
तसेच शुभम आदमाने व नाना शेळके यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर- 404/2024 स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5,7,8 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, एपीआय कायदे, हे. कॉ. इरफान शेख, अशोक शिंदे, दत्ता तेलोरे, बाबा खेडकर, पो. कॉ. गणेश घुले, पो. ना. श्याम जाधव, सविता भांगरे यांसह आदींनी केली आहे.