संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ) : – हरणारा असतो म्हणूनच कोणीतरी जिंकतो. बुद्धिबळ हा बुद्धी चातुर्याचा खेळ असल्याचे प्रतिपादन डॉ. महावीरसिंग चव्हाण यांनी केले आहे.
डॉ. महावीरसिंग चव्हाण पुढे म्हणाले, डॉ. राधेशाम गुंजाळ यांनी स्थापन केलेल्या आदर्श शैक्षणिक संकुलातील वृंदावन कृषी महाविद्यालयात या स्पर्धा होत आहेत. निसर्गरम्य आणि अतिशय प्रसन्न अशा वातावरणात या स्पर्धा होत असल्याने स्पर्धकांच्या बुद्धीचा कस लागणार आहे. हरणारा असतो म्हणूनच कोणीतरी जिंकतो. बुद्धिबळ हा बुद्धी चातुर्याचा खेळ असल्याचे सांगत खेळ खेळती वृंदावनी, कृषी कॉलेजच्या या प्रांगणी या गीतातून त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ म्हणाले, आपल्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेती कृषी विषयक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले विद्यार्थी बुद्धिबळाच्या पटावर देखील आपला पराक्रम सिद्ध करतील असा मला विश्वास आहे.
विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे कृषी क्षेत्रात झालेली प्रगती आणि खाऊजा संस्कृतीमुळे जगातील वाढलेली स्पर्धा हे कृषी पदवीधरांसमोर आव्हान आहे. ते पेलण्याची क्षमता निश्चितच या खेळाडूंमध्ये निर्माण होईल, असेही डॉ. राधेशाम गुंजाळ म्हणाले. प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांनी केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या तीनशेहून अधिक स्पर्धकांना कॉलेजची विद्यार्थिनी व विद्यापीठ खेळाडू साक्षी डोंगरे यांनी स्पर्धकांना शपथ दिली.
सूत्रसंचालन प्रा. प्राची शिंदे यांनी केले. तर संस्थेचे जनसंपर्क अधिकारी काशिनाथ गुंजाळ यांनी आभार मानले.



