लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वारकरी संप्रदायाचा ‘पायी दिंडी’ सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ‘विठ्ठल-रुक्मिणी’ यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्या सौ. रेखा रत्नपारखी मॅडम, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रा. तांबे प्राथमिक विभाग प्रमुख सौ. घोगरे यांच्या हस्ते करण्यात आली.
शालेय परिपाठात आषाढी एकादशीचे महत्त्व श्री. काळे विशद केले. दिलीप कल्हापुरे विद्यार्थिनींना “जय जय राम कृष्ण हरी!” चा जयघोष करावयास लावून वातावरण भक्तिमय केले व प्रवचन रूपी सेवेतून पायी वारीचे व दिंडीचे महत्त्व सांगितले. विद्यार्थिनींनी लेझीम, नृत्य, गायन, पाऊली इत्यादी सादर केले.
पालखीचे प्रस्थान व विद्यार्थ्यांची दिंडी, ज्यामध्ये प्ले ग्रुपपासून ते बारावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी विविध संतांची वेशभूषा करून व वारकरी बनून टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत सहभागी झाले होते.
संपूर्ण वातावरण विठुरायाच्या गजराने, नामघोषाने दुमदुमले होते व साक्षात पंढरपूर येथे अवतरले आहे असे वाटत होते. आजच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी व त्यांच्या मनात भक्तीभाव निर्माण व्हावा, तसेच आपल्या हिंदू धर्माची मूल्ये रुजावीत या उदात्त हेतूने हा उपक्रम शाळेत आयोजित केला गेला. शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील भजन भक्ती गीते गात दिंडीचा आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या शेवटी झालेला रिंगण सोहळा हा दिंडीचे मुख्य आकर्षण ठरला. कार्यक्रमाची नियोजन ‘सुनीता विल्यम्स’ हाऊसच्या प्रतिनिधी सौ. निर्मळ व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. विजया वाघ यांनी आखली होती. दिंडीच्या पालखीचे सजावटीचे काम विद्यालयाचे कलाशिक्षक क्षीरसागर आणि तुपे यांनी केले. अशी माहिती शाळेच्या प्राचार्य सौ. रेखा रत्नपारखी यांनी दिली.
तसेच या कार्यक्रमासाठी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.