संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):–शेतकरी व सर्वसामान्यांचे नेते म्हणून संपूर्ण राज्यात लोकप्रिय असलेले मा. कृषीमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना १२८ कोटी ९८ लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातून सर्वाधिक कृषी उत्पन्न झाले. याचबरोबर त्या काळात सातत्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. महसूल मंत्री आणि कृषिमंत्री म्हणून आमदार थोरात हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय राहिले राज्याचा व्याप सांभाळत असताना त्यांनी संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवली असून या विकासातून संगमनेर तालुका हा मॉडेल ठरला आहे .याचबरोबर उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले आहे.
सतत शेतकरी सर्वसामान्य गोरगरीब यांच्या विकासासाठी काम करणारे आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील ८४९३० शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक विम्यासाठी मोठा पाठपुरावा केला आणि यातून प्रधानमंत्री पिक विमा योजनेमधून 2023 मधून अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक पिक विमा हा संगमनेर तालुक्याला मंजूर झाला आहे. यामध्ये मध्यम नुकसान भरपाई ची आग्रिम रक्कम 33.86 कोटी रुपये मंजूर झाली असून स्थानिक आपत्ती मुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी १० लाख ६५ हजार रुपये आणि अंतिम पीक कापणी प्रयोगावरून आलेल्या उत्पन्नावर आधारित विमा रक्कम एकूण ९५ कोटी १ लाख रुपये असे एकूण १२८ कोटी ९८ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
या पिक विमा कमी उपविभागीय कृषी विलास अधिकारी गायकवाड तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, ओरिएंटल क्रोप इन्शुरन्स कंपनी, सर्व मंडळ कृषि अधिकारी , कृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक याचबरोबर सोसायटी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी मोठी मदत केली.
शेतकऱ्यांना हा पिक विमा बँक खात्यावर मिळणार असल्याने संगमनेर तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.