शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. असून सदरची योजना कायमस्वरूपी राबवली जाणार असल्याची माहिती पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सदर योजनेमुळे मेंढीपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि धनगर व तत्सम समाजाला आर्थिक बळकटी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने आणि मेंढी पालन व्यवसायाला प्रोत्साहन आणि, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासनाने २०१७ वर्षापासून ही योजना सुरु होती. या योजनेची फलश्रुती लक्षात घेता या योजनेची व्याप्ती अधीक वाढून अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा आणि भटक्या प्रवर्गातील समाजात आर्थिक सुबत्ता वाढावी म्हणून मंत्री विखे पाटील यांनी राज्यमंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवला. यावेळी काही बदलासह त्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली. या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या २९ कोटी ५५ लाख इतका निधीला खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल तसेच पशुधन खरेदीच्या बाबतीत ७५ टक्के अनुदानाची रक्कम ७ दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रीयेतून (डीबीटी) लाभार्थीना देण्यात येईल. चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील. असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
सदरची योजना ही केवळ भटक्या जमातीतील प्रवर्गासाठी लागू असणार आहे. सदर योजनेत ६ घटकांचा समावेश करण्यात आले आहेत. सदर योजनेसाठी आता ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत MAHAMESH हे अॅप www.mahamesh.in या संकतेस्थळावरून अथवा गुगल प्ले मधून डाऊनलोड करून अर्ज दिलेल्या सुचनानुसार अर्ज करावा .