कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा) : – जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता 2023- 2024 या राज्यस्तरीय स्पर्धेत ग्रामीण भागातील शाळांमधून कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव, कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्यालयास तृतीय पारितोषिकाने नुकतेच गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह व रोख रक्कम 21 हजार रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमासाठी थोर अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते व जैन इरिगेशन सिस्टीमचे अध्यक्ष अशोक जैन व डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयातील समन्वयक व जेष्ठ शिक्षक अमरसिंग नाईक यांनी पुरस्कार स्वीकारला.
शालेय शिक्षणाबरोबरच स्वच्छतेचे संस्कार बालवयातच विद्यार्थी मनावर घडावे. या गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांचे संस्करण विद्यार्थ्यांमध्ये व्हावे. या उद्देशाने शाळेने या प्रतियोगितेत सहभाग घेतला होता. दरवर्षी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनी गांधी विचारधारा संस्कार परीक्षेस बसतात,त्यातून त्यांना महात्मा गांधीजींच्या आदर्शवत वैयक्तिक तसेच सामाजिक कार्याची माहिती पुस्तकांच्या माध्यमातून देण्यात येते व त्यावर आधारित परीक्षा घेण्यात येते. यातून विद्यार्थ्यांमध्ये सत्य, अहिंसा व समतेची शिकवण रुजवली जाते. तसेच स्वच्छ शाळा उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागल्या आहेत. त्याचबरोबर गावातील सामाजिक संस्थांनी देखील या स्वच्छता चळवळीत सहभाग घेऊन स्वच्छतेची सवय घरोघरी पोहोचविण्यासाठी काम केले आहे.
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता अंतर्गत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता गुंजाळ, उपमुख्याध्यापक मधुकर गोडे, प्रभारी पर्यवेक्षक सुरेश खंडिझोड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, सर्व विद्यार्थीनी तसेच गांधी रिसर्च फाउंडेशनचे विद्यालयातील समन्वयक अमरसिंग नाईक यांनी विद्यालयात स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवून विद्यार्थिनीमध्ये स्वच्छतेची रुजवणूक करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले, त्यातूनच विद्यालयाला हा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराबद्दल माजी आमदार अशोकराव काळे, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, स्थानिक स्कुल कमिटीच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तसेच सहाय्यक विभागीय अधिकारी, विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सर्व सदस्य, माता पालक संघ सर्व आजी-माजी विद्यार्थिनी यांनी विद्यालयातील सर्वांचे अभिनंदन केले.